सातारा : कोरोनाचा संसर्ग अत्यंत वेगाने फैलावत असल्यामुळे पोलिसांनी यावर उपाय म्हणून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याचा सपाटा लावलाय. आतापर्यंत पोलिसांना १४ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, पोलिसांनी कारवाईची ही मोहीम अधिक तीव्र केली आहे.
सातारा शहरामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी शहरातील विविध चौकांमध्ये तपासणी केंद्र उभारले आहेत. रोज सकाळ संध्याकाळ पोलीस त्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, अनेकजण काहीही काम नसताना घराबाहेर पडत आहेत, अशा लोकांना पोलिसांनी सुरुवातीला समज दिली. मात्र, तरीही यामध्ये काही फरक पडला नाही. त्यामुळे पोलिसांनी सरतेशेवटी वाहने जप्त करण्याचा निर्णय घेतला, असे असतानाही अनेक जण मंडईचे कारण सांगून तसेच दवाखान्याचे कारण सांगून घराबाहेर पडू लागले. त्यामुळे पोलिसांनी यावर उपाय म्हणून जे कोणी घराबाहेर पडतील त्यांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांसोबत दोन डॉक्टर आणि चार वैद्यकीय कर्मचारी असा ताफा तैनात करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या प्रत्येक युवकाची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आतापर्यंत १३ जण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नऊ युवकांचा समावेश आहे. हे सर्वजण बाधित आढळून आल्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. याबरोबरच त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.
चौकट : शहरात पाच ठिकाणी तपासणी
पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली. बाहेर फिरणाऱ्यांची संख्या थोडीफार कमी झाली; परंतु
अशा प्रकारची कारवाई पोलिसांनी अधिकच तीव्र केली असून शहरातील पाच ठिकाणी अशा प्रकारच्या कोरोना करण्यात येत आहेत.
अशा प्रकारची कोरोना चाचणी होऊ लागल्यानंतर रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. मात्र, आज सायंकाळच्या सुमारास वर्दळ अधिकच वाढू लागली. विशेषता पोलिसांनी साताऱ्यातील मुख्य चौक असलेल्या मोती चौकात ही कारवाई अधिक तीव्र केली होती. त्यामुळे अनेकजण घराबाहेर पडत नव्हते.
चौकट : कारणे तीच कोणाचा दवाखाना तर कोणाचा भाजीपाला
पोलिसांनी वाहन अडविल्यानंतर वाहनचालकांची अनेक कारणे समोर येत असल्याचे दिसून आले. काही वाहनचालक भाजी आणण्यासाठी चाललोय, असे सांगत होते तर काही वाहन चालक दवाखान्यात नातेवाइकांना पहायला निघालोय अशी उत्तरे देत होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडे खातरजमा केल्यानंतर त्यांचा खोटारडेपणा उघड होत होता, मग पोलिसांनी अशा लोकांवर दंडात्मक कारवाई तर केलीच शिवाय गुन्हेसुद्धा दाखल केले.
चौकट : कोरोनाचे एकूण रुग्ण १४४८३३
एकूण कोरोना मुक्त १२३७७०
दुसऱ्या लाटेत किती रिकामटेकड्यांची कोरोना चाचणी करण्यात आली- ७८
पॉझिटिव्ह किती-१३