कºहाड : ‘रयत शिक्षण संस्थेतील वस्तुस्थिती मांडली, त्यामुळे शरद पवार दुखावले आहेत. अन् माझी मानसिक स्थिती बिघडल्याची टिप्पणी करून वेळ मारून नेली आहे. खरंतर माझी मानसिक स्थिती उत्तम आहे. हवी तर पवारांनी चार-पाच मनोरुग्ण तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून माझी तपासणी करून घ्यावी, माझी तशी तयारी आहे. पण, तत्पूर्वी शरद पवारांनी स्वत:ची नार्को टेस्ट करून घ्यावी म्हणजे दूध का दूध अन् पाणी का पाणी होईल,’ असा टोला रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य प्रा. यू. जी. पाटील यांनी एका पत्रकाद्वारे लगावला आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘रयत शिक्षण संस्थेत शरद पवारांनी आपला सगळा गोतावळा आणला आहे. त्यांनी आता अध्यक्षपदापासून दूर राहावे, असे माझे मत मी मांडले होते. त्याला योग्य उत्तर देण्याऐवजी त्यांनी माझी मानसिक स्थिती बिघडल्याची टिप्पणी करीत मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यावर केलेल्या आरोपाला उत्तर म्हणून मी तज्ज्ञ डॉक्टरांकडून माझी तपासणी करायला तयार आहे. पण, शरद पवारांनीही नार्को टेस्टची तयारी ठेवावी. त्यांनी जर नार्को टेस्ट करून घेतली तर सर्व सत्य समाजासमोर येईल अन् तीच माझी अपेक्षा आहे.’ ‘वास्तविक शरद पवारांनी माझ्या तब्बेतीविषयी बोलण्याऐवजी आपल्या तब्बेतीची काळजी घ्यावी, कारण त्यांच्या कामाचा व्याप मोठा आहे, ’ असा प्रेमाचा सल्लाही पत्रकात शेवटी दिला आहे. ‘रयत’ शिक्षण संस्थेच्या घटनेत जनरल बॉडी सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची कोणतीही तरतूद नाही. सदस्याने स्वत:च राजीनामा द्यावा लागतो; पण माझे सदस्यत्व रद्द करण्याचा वल्गना संस्थेतील काहीजण करीत आहेत. त्यांनी अगोदर घटनेचा नीट अभ्यास करावा अन् हवा तो निर्णय घ्यावा. पण, घटनाबाह्य निर्णय घेतल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे यू. जी. पाटील यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
पवारांनी नार्को टेस्ट करून घ्यावी : पाटील
By admin | Updated: May 10, 2014 23:39 IST