हाफ फोटो...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा तालुक्यातील आरफळ येथील प्रथमेश उमेश पवार-पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळविले. देशात तृतीय, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान मिळविला असून, त्यांची सीएपीएफ (सेंट्रल आर्म पोलीस फोर्स) मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून निवड झाली आहे.
आरफळसारख्या ग्रामीण भागातील प्रथमेश पवार यांनी यूपीएससी परीक्षेत चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळविले आहे. त्यांचे वडील शेतकरी आहेत. प्रथमेश यांनी पुण्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. मागील तीन वर्षांपासून पुण्यातच केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करण्यात येत होती. पहिल्या दोन प्रयत्नांत मुलाखतीपर्यंत जाऊनही त्यांना अपयश आले होते. या अपयशानेही न खचता त्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली. देशात तिसऱ्या, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने येण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.
प्रथमेश पवार यांच्या या यशाने साताऱ्याचे नाव आणखी उंचावले आहे; तर या यशाबद्दल त्यांचा विविध मान्यवरांनी सत्कार केला.
.....................................................