शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

सातारा जिल्ह्यात स्थानिक नेत्यांच्या भोवतीच पक्षांचे राजकारण

By admin | Updated: November 11, 2016 00:19 IST

महाबळेश्वरात अपक्षांची आघाडी : वाईमध्ये व्यक्तिगत महत्वकांक्षाच महत्वाची, दहीवडी, म्हसवडमध्ये गोरे बंधूंची ‘भाऊबंदकी’, कऱ्हाडमध्ये आमदारांमध्ये वितुष्ठ-- सातारा जिल्हा वार्तापत्र

सचिन जवळकोटे -- सातारा --ऐतिहासिक राजघराण्यांचा दबदबा असणारा सातारा जिल्हा सध्या तब्बल चौदा ठिकाणच्या निवडणुकांमुळे पुरता राजकारणमय झालाय. आठ नगरपालिका अन् नवीन सहा नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर नेहमीप्रमाणं अनेक ‘आयाराम-गयाराम’ मंडळींची पळापळ सुरू झालीय. तसं पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील बहुतांश गावांत पक्षीय राजकारणाची परंपरा जवळपास नाहीच. त्या-त्या गावातील नेत्यांची भूमिका हाच त्यांच्या पक्षाचा अजेंडा ठरत असतो. फक्त फरक एवढाच की, यंदाच्या निवडणुकीत हा नेता कोणत्या पक्षाशी बांधील (?) आहे. महाबळेश्वर नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांनी ‘अपक्ष’ बिल्ला छातीला लावून स्वतंत्र आघाडी स्थापन केल्याच्या कारणावरून त्यांचं सदस्यत्व अपात्र ठरविलं गेलं. त्यामुळं माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांना हुरूप आला असला तरी सध्या ते शिवसेनेत असल्यानं राष्ट्रवादीचा लढा यंदा काँग्रेसऐवजी सेनेशीच नक्की होणार. बावळेकरांची ‘लोकमित्र जनसेवा आघाडी’ तयार झाली असली तरी दोघे वगळता यात एकही जुना चेहरा नाही. महाबळेश्वर पर्यटन विकास आघाडी ऊर्फ आमदार गटाने मात्र सध्या ‘अपक्ष’ म्हणून अर्ज भरलेल्यांच्या हातातच ‘काठी’ देण्याचं निश्चित केलंय म्हणे. पाचगणीत तर ‘पक्ष म्हणजे काय रे भाऊ?’ अशीच आजपर्यंतची परिस्थिती. इथल्या स्थानिक नेत्यांच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपुढं सारेच पक्ष नेहमी गौण ठरलेले. अनेक वर्षे नगराध्यक्षपदी विराजमान राहिलेल्या लक्ष्मी कऱ्हाडकर यंदाही ‘अनुसूचित खुल्या’ वर्गामधून नगराध्यक्षपदाची खुर्ची मिळविण्याच्या प्रयत्नात. मात्र, दिवाळी पूजनातील ‘लक्ष्मी’ यंदा इथं अधिक रूबाबात फिरताना दिसतेय.पसरणी घाटातून खाली आलं की वाईचा कृष्णा डोह लागतो. वाईकरांना ‘महा’ या शब्दाचं भलतंच कौतुक असावं. इथला गणपतीही साधासुधा नव्हे तर ‘महागणपती.’ त्यामुळं आमदार मकरंद पाटील गटाच्या विरोधात झाडून सारे पक्ष एकत्र आलेत अन् त्यांनी आपल्या पॅनेलचं नामकरण केलंय ‘महाआघाडी.’ विशेष म्हणजे, ‘महागणपती’च्या पायथ्याशी ‘महानारळ’ फोडून मदन भोसले यांनी ‘महासंघर्षा’ची घोषणा केलीय. वाईच्या इतिहासात कदाचित प्रथमच एवढे सारे पक्ष एकत्र आलेत. वाईतील साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला विधानसभेचीच झालर असते. आता ही तर नगरपालिकेची निवडणूक. त्यामुळं आमदार मकरंद आबा प्रत्येक पाऊल सावधपणे उचलून टाकताहेत. त्यांचे बरेचशे उमेदवार अद्याप जाहीर झाले नसले तरीही आतून चांगलेच कामाला लागलेत.खंडाळा तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षांत अनेक स्थानिक नेत्यांचा अकस्मात उदय झालाय. औद्योगिकीकरणामुळं ओसाड माळरानावरच्या जागेला सोन्याची किंमत प्राप्त होताच गावोगावी गुंठे-पाटील तयार झाले. खिशात पैसा खुळखुळू लागला, त्याचा प्रत्यय यंदाच्या खंडाळा नगरपंचायतीच्या पहिल्या-वाहिल्या निवडणुकीत येणार नक्की. म्हणूनच इथे ‘आबा गटाचे गाढवे विरुद्ध दादा गटाचे गाढवे’ असंच घमासान होणार आहे.फलटणच्या राजकीय सारीपाटावर आजपावेतो तीनच नावं नेहमी आलटून-पालटून चर्चेत राहिलेली. सत्ताधारी रामराजे गट, त्यांना सातत्यानं विरोध करणारा हिंदुराव निंबाळकर गट अन् स्वर्गीय माजी आमदार चिमणरावांच्या निधनानंतर थोडाफार विस्कळीत झालेला कदम गट. आता चिमणरावांचे सुपुत्र सह्याद्री यांनी भाजपात प्रवेश करून फलटणच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न चालविलाय. ‘राज्यात रामराजे, जिल्हा परिषदेत संजीवराजे अन् नगरपालिकेत रघुनाथराजे’ अशी आपापल्या साम्राज्याची विभागणी करून छानपैकी सत्ताकारण करणाऱ्या राजे बंधूंना ‘सह्याद्रीत फुलणारं कमळ’ किती त्रासदायक ठरणार, हे यंदाच्या निवडणुकीत नक्कीच दिसणार. थोडक्यात, पुढच्या विधानसभेची ही ‘लिटमस टेस्ट’च.दहिवडी अन् म्हसवडमध्ये गोरेंची ‘भाऊबंदकी’ भलतीच रंगणार असल्याची चिन्हं आत्तापासूनच दिसू लागलीत. सांगली-सातारा विधान परिषदेसाठी आमदार जयकुमार गोरेंचे बंधू शेखर गोरे यांना तिकीट देऊन राष्ट्रवादीनं एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत. राष्ट्रवादीमुळं शेखरभाऊंचा किती फायदा झाला, हे विधान परिषदेच्या निकालानंतर कळून चुकेल; परंतु शेखरभाऊंमुळं घड्याळाचे काटे किती जोरानं फिरू लागलेत, हे पालिका-पंचायत निवडणुकीत दिसून येऊ लागलंय. जिथं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शोधूनही लवकर सापडत नव्हता; तिथं पक्षाचं अख्खंच्या अख्खं पॅनेल उभं करण्याचा चमत्कार राष्ट्रवादीनं घडवून आणलाय.वडूज नगरपंचायतीत डॉ. दिलीप येळगावकर यांनी कमळाच्या पुनर्राेपणासाठी खतपाणी घालण्यावर जोर लावलाय. रणजितसिंह देशमुख यांच्याही गटानं ‘धनुष्यबाणाची प्रत्यंचा’ ताणून धरलीय. सोबतीला जयकुमारांचा ‘हात’ अन् शेखरभाऊंचं नवंकोरं ‘घड्याळ’ आहेच. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असणारे येळगावकर डॉक्टर सध्या भाजपात, तर एकेकाळी पृथ्वीराज चव्हाणांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे रणजितभैया सध्या शिवसेनेत आहेत, याचा उल्लेख करणं..अनिवार्य. असो. कोरेगावात पुन्हा एकदा सारे ‘शशिकांत शिंदे विरोधक’ नव्या ताकदीनं एकवटले असले तरी बुद्धिबळाच्या राजकारणात माहीर असणाऱ्या आमदारांनी नेहमीप्रमाणं घोडा आडवा-तिडवा चालवत समोरचा प्याद्या टिपण्याची परंपरा सुरूच ठेवलीय. रहिमतपुरातही चित्रलेखा माने-कदम या पुन्हा एकदा काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेशल्या असल्या तरी, यंदा शिवसेनेच्या नितीन बानुगडे-पाटलांचे मावळे इथं काय चमत्कार घडविणार, याकडंही साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय. इकडं मेढ्यात महिला नगराध्यक्षपदासाठी राखीव असणाऱ्या वॉर्डात एकही महिला नसल्यानं हे पद आता रिकामंच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. यामुळं सर्वच पक्षांची गोची झालीय.कऱ्हाडात मात्र दोन आमदारांमधलं वितुष्ठ अनेकांच्या मनात गुदगुल्या करणारं ठरलंय. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची अख्खी फौज पृथ्वीराजबाबांच्या विरोधात आग ओकत असताना त्यांचा आतून प्रचार करण्यात राष्ट्रवादीच्या बाळासाहेब पाटलांनी धन्यता मानली होती. गेल्या दोन वर्षांतही व्यासपीठावर मांडीला मांडी लावून या दोन आमदारांमधील दिलजमाईचा सिलसिला चालूच राहिला. मात्र, यंदाच्या पालिका निवडणुकीत ‘सांगा... कऱ्हाड शहर कुणाचं?’ असा प्रश्न उभा ठाकताच बाका प्रसंग उभा ठाकला. ‘कऱ्हाड शहर जरी पृथ्वीराज बाबांच्या दक्षिण मतदारसंघात असलं तरी पालिका पिढ्यान्पिढ्या आमचीच,’ असा ‘उत्तर’ नसलेला प्रश्न विचारला जाताच पृथ्वीराज बाबा गट सावध झाला. ‘हवेत असणाऱ्यांना जमिनीवर आणलंच पाहिजे’ म्हणत स्वतंत्र आघाडीची घोषणा केली. आता गंमत अशी की, या क्षणापर्यंत तरी सर्वच्या सर्व वॉर्डांत पाटलांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार दिसेनात. हे कमी की काय म्हणून अतुल भोसले गट अन् भाजप पक्षाची आघाडी दोन्ही आमदारांना डोकेदुखी ठरू लागलीय. चव्हाण-भोसले-पाटील तिरंगी लढतीत कऱ्हाडच्या राजकारणाचं चांगलंच मंथन होणारंय, हे मात्र नक्की. पाटणमध्ये तर एका उमेदवाराला बिनविरोधच्या टप्प्यापर्यंत पोहोचविण्यात माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांना यश आलंय. परंपरागत शंभूराज देसाई गट अन् पाटणकर गट या नव्या पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमने-सामने आले असले तरी शहरात अजूनही आपलाच ‘होल्ड’ असल्याचा दावा विक्रमसिंहदादा कितपत खरा करून दाखवितात, हे दिसून येणार आहेसातारा शहरात ‘लगाव निशाना... उडाव बत्ती’आजपर्यंत साताऱ्यात दोन राजे हेच दोन पक्ष असायचे. पालिकेच्या गेल्या निवडणुकीत तब्बल दीड डझन नगरसेवक बिनविरोध निवडून आणण्याचा चमत्कार याच साताऱ्यात घडला होता; परंतु आता दोन्ही राजेंमधील मनोमिलनाच्या भ्रमाचा भोपळा फुटल्यानंतर क्षणार्धात वारं बदललं. यंदा एकेका वॉर्डात डझनभर उमेदवार अर्ज भरून उभे ठाकलेत. हे कमी पडलं की काय म्हणून भाजपानंही प्रथमच स्वत:चं पॅनेल उभं केलंय. कमळाला शह देण्यासाठी ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणत शिवसेनेनंही काही ठिकाणी उमेदवार उभं केलेत. नगराध्यक्षपदासाठी खुद्द आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे प्रथमच सातारकरांसमोर आल्यात. त्यानंतर ‘लुंगे-सुंगे कुणीही अर्ज भरत असतात...’ अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी आपल्या नेहमीच्या खास स्टाईलमध्ये व्यक्त केलीय. त्यामुळं ‘दहशतमुक्त सातारा’ची घोषणा करत वेदांतिकाराजेंनी यापुढील काळात आपण शहराचं नेतृत्व अधिक आक्रमकपणे पुढं नेणार असल्याचं सूचित केलंय. मतदानाला अजून दोन आठवडे शिल्लक आहेत. या काळात दोन्ही राजेंचे गट प्रचारात एकमेकांवर तुटून पडतील, तेव्हा सर्वांत जास्त आनंद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना होणार, हे मात्र निश्चित... कारण हे दोन्ही राजे जोपर्यंत एक होते, तोपर्यंत साताऱ्याच्या बाबतीत कोणतीच स्पष्ट भूमिका बारामतीकरांना घेता येत नव्हती. उद्याच्या अंकातरत्नागिरी वार्तापत्र