प्रमोद सुकरे
कऱ्हड: निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कच्च्या वाॅर्ड रचना तयार करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. त्यामुळे कऱ्हाड पालिका वर्तुळात राजकीय घडामोडी सुरू झालेल्या आहेत. येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भाने आराखडे होऊ लागले आहेत; पण या निवडणुकीत पक्षीय झेंडे झळकणार ही पुन्हा आघाड्यांचेच राजकारण होणार, याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
कऱ्हाड पालिकेची सध्या शतकोत्तर अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. सन १८५५ साली येथील पालिकेची स्थापना झाली आहे. तर ज्येष्ठ नेते दिवंगत पी. डी. पाटील यांनी सलग ४० वर्षे नगराध्यक्षपद भूषवत इतिहास रचला आहे. सुरुवातीच्या काळात पक्ष किंवा आघाडी असे राजकारण येथे होत नव्हते. पण १९९६ पासून पालिकेत आघाड्यांचे राजकारण सुरू झालेली दिसते.
सन २०१६ साली झालेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती आघाडीने १६ जागा जिंकत बहुमत मिळवले. पण भाजपच्या रोहिणी शिंदे यांनी थेट नगराध्यक्षा निवडणुकीत बाजी मारली. तसेच भाजपच्या चिन्हावर ४ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीला ६ जागा मिळाल्या. ते विरोधी बाकावर बसले. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या ३ नगरसेवकांपैकी एकाने जनशक्ती आघाडीला तर दोघांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
गतवेळी १४ प्रभागातून २९ नगरसेवक निवडून आले होते. त्यात ३ मागासवर्गीय प्रवर्गातून तर ८ इतर मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आले होते. उरलेले नगरसेवक खुल्या प्रवर्गातून विजय झाले होते. यावर्षी प्रभाग रचनेत बदल होऊन सिंगल वाॅर्ड रचना होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे २९ वाॅर्ड मधून प्रत्येकी एक नगरसेवक निवडला जाईल अशी परिस्थिती आहे.
येऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस व भाजपने पक्षीय झेंडे खांद्यावर घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत काही महिन्यांपूर्वीच दिली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सर्वांना बरोबर घेऊन लोकशाही आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात पक्षीय झेंडे खांद्यावर घेतले जाणार की पुन्हा आघाड्यांच्याच राजकारणाचा खेळ होणार हे पाहावे लागणार आहे.
गत साडेचार वर्षांचा पालिकेतील कारभार पाहिला तर फक्त सत्तेचे त्रांगडे पाहायला मिळाले आहे. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांच्याकडे बहुमत नसल्याने त्यांची कसरत कराडकरांनी पाहिली आहे. तर बहुमतात असणाऱ्या जनशक्ती आघाडीचे त्रिभाजन झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विकासकामांचा मेळ हवा कसा बसलेला दिसत नाही. खरे तर सत्ता संपत आली तरी पालिकेत नेमके सत्ताधारी कोण हेच कराडकरांना समजलेले नाही, असेच म्हणावे लागेल.
चौकटी वेगळ्या पाठवित आहे.