आदर्की : फलटण पश्चिम तालुक्यात सकाळी खडीकरण, दुसऱ्या दिवशी डांबरीकरण अशी तीन ते चार दिवसांत लाखो रुपयांची काम पूर्ण झाल्याचे फलक काम पूर्ण होण्याअगोदरच झळकत असल्याने लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष तर अधिकारी गांधारीची भूमिका घेत असल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयाला चुना लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
फलटण पश्चिम तालुक्यात विविध गावांमध्ये शासन विविध कार्यक्रम राबवत असताना लाखो रुपयांचा निधी खर्च करीत असते. त्यामध्ये विकासाच्या योजना राबविल्या आहेत ; पण रस्ता, काँक्रीटीकरण, भुयारी गटार योजना आदी कामे मार्च एन्डच्या नावाखाली जोमात सुरू आहेत.
डांबरीकरण, साईडपट्टा, गटार, नाले, त्याबरोबर भुयारी गटाराचे चेंबर बांधणे आदी कामे बाकी असताना कामे पूर्ण झाल्याचे फलक झळकत आहेत. लोकप्रतिनिधी आपल्या मर्जीतील ठेकेदार नेमतात तर त्यामुळे अधिकारी गांधारीची भूमिका घेतल्याने नित्कृष्ट दर्जाची कामे होऊन कामे पूर्ण होण्याअगोदरच काम पूर्ण झाल्याचे फलक झळकत आहेत.
चौकट
चुकीचा लावला होता फलक...
आदर्की खुर्द येथे डांबरीकरण झाल्याचा फलक लावला. त्यादिवशी काम सुरू ७ मार्च २०२१ तर काम पूर्ण ५ मार्च २०२१ असा चुकीचा फलक लावला होता. त्यानंतर फलकावर खाडाखोड करण्यात आली. परंतु, अंतिम डांबरीकरण, साईडपट्ट्या भरण्याचे काम बाकी असताना काम पूर्ण झाल्याचा फलक लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
19आदर्की
फोटो -सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाने काम पूर्ण होण्याअगोदर फलक लावले आहेत.