सातारा : तळीराम चुकला तर त्याला कुठे शोधावे...? यक्षप्रश्नच! पण सातारा बसस्थानक परिसरात या प्रश्नालाही उत्तर आहे... ‘डबक्यात’! कारण या परिसरातील कोणत्याही गुत्त्यावर जाऊन मद्यसेवन करणारा माणूस जर चुकला, तर तो मानवनिर्मित डबक्यात हमखास सापडतो. अशा ‘पतितां’ना डबक्यातून बाहेर काढणे हे काही स्थानिकांना एक कामच होऊन बसले आहे, तर अनेकजण तळीरामांची तारांबळ पाहून मनसोक्त करमणूक करून घेत आहेत.याबाबत मनोरंजक; पण तितकीच चिंता करायला लावणारी माहिती अशी : पोवई नाक्यावरून बसस्थानकाकडे जाणारा रस्ता कायम गजबजलेला असतो. वाहने आणि पादचाऱ्यांनी कायम ओसंडून वाहणाऱ्या या रस्त्यावर गटाराचे एक काम तब्बल दोन महिने रखडले आहे. काँग्रेस कमिटीच्या समोर सुरू असलेले हे काम का रखडले, याचे उत्तर कुणालाच मिळालेले नाही. तथापि, या कामासाठी चांगला लांब-रुंद चर खणून ठेवला आहे. या चरात पावसाचे पाणी आणि आजूबाजूने वाहून येणारे सांडपाणी मुबलक प्रमाणात साचले आहे. त्यामुळे या चराला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.हे डबके अंधारातून चालत येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा वाहनावरील नियंत्रण सुटलेल्या एखाद्या वाहनचालकाला जेवढे खतरनाक वाटते, तेवढे मद्यपींना वाटत नाही. परिसरात देशी-विदेशी दारूचे गुत्तेही मुबलक प्रमाणात आहेत. तिथून बाहेर पडलेला मद्यपी ना ‘पादचारी’ असतो, ना ‘वाहनचालक’. तो तर ‘विमानात’ असतो. अनेकदा त्याचे हे ‘विमान’ नेम धरून या डबक्यात ‘लँड’ होते आणि परिसरात हशा पिकतो. या परिसरात पथारीवाल्यांची संख्या मोठी आहे. शिवाय, काळ््या-पिवळ््या ‘वडाप’च्या जीप परिसरातच उभ्या असतात. भाजीविक्रेत्यांपासून कटलरी-फळे विकणाऱ्यांपर्यंत अनेकांचा दिवस या परिसरातच व्यतीत होतो. या मंडळींना तळीरामांचे डबक्यात पडणे आता सवयीचे झाले आहे. ‘अती झालं आणि हसू आलं’ या उक्तीप्रमाणे तळीरामांची पंचाईत ही मंडळी आता ‘एन्जॉय’ करू लागलीत. तथापि, याच परिसरात तळीरामांना मदतीचा हात देणारेही ठराविक लोक आहेत. झोकांड्या खात एखादा मद्यपी डबक्यात पडला रे पडला, की ही मंडळी मदतीसाठी धावतात. सामान्य माणसाला डबक्यातून बाहेर काढणे जितके सोपे असते, तितके तळीरामांना बाहेर काढणे सोपे नसते. डबक्याच्या ओबडधोबड काठावरून त्याचे पाय सारखे घसरत असतात आणि तो पुन:पुन्हा पाण्यात पडत असतो. तरीही अनेकजण हे काम हिरीरीने करतात. (प्रतिनिधी)
चुकला तळीराम डबक्यात!
By admin | Updated: August 25, 2014 22:12 IST