लोकमत न्यूज नेटवर्क
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील विरळीसारख्या डोंगराळ भागातील जानुबाई विद्यालयाने चक्क पाणी टंचाईवर मात केली आहे. या विद्यालयाने पत्र्याच्या इमारतीवर पडणारं पावसाचं पाणी अडवून ते पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून पुन्हा बोअरमध्ये सोडून रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग यशस्वी केला आहे.
माण तालुका अवर्षणग्रस्त असल्याने अधूनमधून दुष्काळ, पाणी टंचाईसारख्या समस्यांचा येथील ग्रामस्थांना नेहमीच सामना करावा लागतो. शिवाय पावसाळ्यात ऐनवेळी जेव्हा-जेव्हा पाऊस पडतो, त्यावेळी पावसाचं पाणी वाहून जातं. मग गावात उन्हाळ्यात पाणी टंचाई पाचवीलाच पुजलेली असते. विरळी गावापासून अर्धा किलोमीटरवर दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या जानुबाई विद्यालयातील ४६४ विद्यार्थ्यांची आणि साधारणपणे २२ कर्मचाऱ्यांची दोन वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ होत होती.
शाळेसाठी चार-पाच दिवसांनी टँकरने पाणी घेतलं जायंच. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून अवघे सात हजार रुपये खर्चून शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात आला व तो यशस्वीही झाला. अशाप्रकारे रेन हार्वेस्टिंग करुन पावसाचे पाणी साचवून पुनश्च वापरात आणून विरळीतील जानुबाई विद्यालयाने पाणी टंचाईवर यशस्वीपणे मात केली आहे. गेल्या उन्हाळ्यातसुद्धा शाळेच्या बोअरवेलला भरपूर पाणी असल्याने शाळेभोवती हिरवीगार झाडे डोलू लागली आहेत.
(कोट)
डोंगराळ भागात शाळा असल्याने, मागील पंधरा वर्षांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला. मात्र, दोन वर्षांपूर्वी रेन वाॅटर हार्वेस्टिंग करून पावसाचे पाणी बोअरवेलमध्ये सोडल्याने भरपूर पाणी येत आहे. शाळेभोवती वेगवेगळे वृक्ष, फुलझाडे लावल्याने दोन एकर क्षेत्र असलेला शाळेचा परिसर अतिशय सुंदर झाला आहे.
- कैलास माने, मुख्याध्यापक, जानुबाई विद्यालय
(चौकट)
कायमस्वरूपी दुष्काळ अन् टंचाईसदृश्य माण तालुक्यातील नागरिकांसाठी रेन हार्वेस्टिंगचा प्रयोग वरदान ठरत आहे. या प्रकल्पामुळे पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. ग्रामीण भागातील शक्य तितक्या नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग राबविल्यास पाणी टंचाईचे निवारण होईल.
फोटो : २० वरकुटे मलवडी
विरळी (ता. माण) येथील जानुबाई विद्यालयात रेन हार्वेस्टिंगद्वारे पाणी टंचाईवर मात करण्यात आली आहे.
लोगो : पॉझिटिव्ह स्टोरी