औंध : औंधसह परिसरात रब्बी हंगामातील सुगीचे दिवस सुरू आहेत. ज्वारी, हरभरा, कांदा, गहू, आदी पिकांची काढणी, काटणी, मळणी सुरू आहे. आपली सुगी लवकर घरी कशी येईल, या गडबडीत बळिराजा व्यस्त आहे. त्यामुळे मजुरांच्या शोधात सर्वजण आहेत. मात्र, उन्हाच्या तडाख्याने मजुरांनीही आपले कामाचे वेळापत्रक बदलले आहे. दिवसभर काम न करता सकाळी लवकर व सायंकाळी उशिरा असा कामाचा धडाका लावला आहे. त्यामुळे त्यांच्या वेळापत्रकानुसार शेतकऱ्यांनाही आपले वेळापत्रक बदलले आहे.
मार्च महिन्याच्या प्रारंभीच उन्हाचे चटके लागत असल्याने सकाळी ११ ते सायंकाळी पाचला शेतात जाणाऱ्या शेतमजूर महिला व पुरुष वर्गाने गरिबीच्या चटक्याबरोबर उन्हाचे चटके नको म्हणून कामाच्या वेळेतच बदल केला असल्याचे चित्र औंध परिसरात दिसत आहे. शेतमजूर सकाळी सातच्या आत शेतात जाऊन दुपारी बारा वाजता सुटी करीत आहेत; त्यामुळे उन्हाच्या झळांपासून बचाव होत आहे, तर प्रकृतीही चांगली राहत आहे, असे मत अनेक मजुरांनी व्यक्त केले. सलग काम होत असल्याने शेतकऱ्यांनाही ते परवडत आहे.
परिसरात आता ज्वारी काढणीची लगबग सुरू आहे. त्यासाठी पुरुष शेतमजूर सायंकाळी तसेच पहाटे लवकर काम करण्यासाठी शेतात जात आहेत, तर दुपारच्या उन्हाच्या वेळेस घरी आराम करीत आहेत, उन्हामुळे कामही होत नाही व शारीरिक त्रास पण जास्त होतो. त्यामुळे सध्या सुगी पहाटे, सकाळी लवकर व सायंकाळी सुरू असल्याचे दिसत आहे.
चौकट
डबल ड्यूटीची मजुरी...
सकाळी सात वाजता कामावर गेलेल्या मजुरांचा बारा वाजेपर्यंत एक दिवसाचा पगार मिळतो; तर त्यानंतर आणखी पुढे काम केल्यावर त्याचाही पगार मिळतो; त्यामुळे डबल ड्यूटीवर सध्या मजुरांचा जोर आहे.
१४औंध
फोटो :- औंधसह परिसरातील मजूर वर्गाने उन्हामुळे आपले कामाचे वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे कामेही उरकत असल्याचे दिसून येत आहे. (छाया : रशीद शेख)