मरळीतील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची धुरा सांभाळणाऱ्या यशराज शंभुराज देसाई यांनी कारखाना प्रशासन आणि मशिनरी यामध्ये आमूलाग्र बदल करून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक अत्याधुनिक सुविधा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यशराज देसाई यांनी नव्यानेच कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकरी यांच्या उसाची नोंदी ऑनलाइन अॅपद्वारे करण्याचा निर्णय घेतला. त्याचा प्रारंभही नुकताच करण्यात आला. दिवशी बुद्रुक येथील शेतकरी विवेक सूर्यवंशी यांच्या उसाच्या क्षेत्राला त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली आणि त्यांच्या ऊस क्षेत्राची थेट जागेवरच स्वत: ऑनलाइन नोंद केली.
कारखान्याने सुरू केलेल्या ऑनलाइन अॅपमुळे शेतकऱ्यांच्या उसाच्या क्षेत्राची ऑनलाइन नोंद ही कारखाना कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष जागेवर जाऊन घ्यावी लागणार आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे ज्या क्षेत्राची नोंद केली आहे त्याचे क्षेत्रफळ बरोबर येणार आहे. परिणामी, ऊस तोडणी प्रोग्राम राबविताना अचूकता येणार असून शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार राहणार नाही, असा विश्वास यशराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, कार्यकारी संचालक सुहास देसाई, विवेक सूर्यवंशी, दादासाहेब जाधव, संतोष डोंगरे, जालिंदर डोंगरे, बाबूराव सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, बाळासाहेब सूर्यवंशी, संदीप पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
फोटो : ०१केआरडी०४
कॅप्शन : दिवशी बुद्रूक, ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यासाठी यशराज देसाई यांच्या हस्ते मोबाइल अॅपद्वारे उसाची ऑनलाइन नोंद करण्यात आली.