सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेकांना मोबाइलवरून ‘लॉटरी लागली आहे. एवढी रक्कम भरल्यास पूर्ण रक्कम मिळेल’ असा मेसेज पाठविला जात आहे. त्यातून ऑनलाइन फसवणूक होत असल्याचा धोका वाढला आहे. या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले जात आहे.
००००००००००
बाजारात गर्दी
सातारा : साताऱ्यातील जुन्या मोटार स्टॅण्ड परिसरात दर रविवारी आठवडा बाजार भरत असतो. या ठिकाणी कोरोनामुळे मंडई बंद करण्यात आली असली, तरी मंडईच्या बाहेर विक्रेत्यांची चांगलीच गर्दी होत असते. पोलीस आले की, ते तेवढ्यापुरते पळून जातात, पण परत जागेवर येऊन बसतात. अनेक जण गर्दीमध्येही विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे धोका वाढत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
००००००००
नोटा स्वीकारण्यावरून गोंधळाचे वातावरण
सातारा : साताऱ्यातील अनेक व्यापारी पाच रुपयांच्या नोटा स्वीकारत नाहीत. आठवडा बाजारात तर ‘पाचच्या नोटा बंद झाल्या असल्याचे’ व्यापारी बिनधास्त सांगत असतात, तसेच सध्या दहा रुपयांच्या नोटा बाजारात वाढल्या आहेत. त्याही खराब झालेल्या असल्याने नोटा स्वीकारण्यावरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत योग्य तो खुलासा करण्याची मागणी केली जात आहे.
००००००००००
जीम बंद असल्याने छतावर व्यायाम
सातारा : कोरोनानंतर जीम बंद करण्यात आल्या अहेत. गेल्या वर्षभरात तरुणांना म्हणावा तसा व्यायाम करता आला नव्हता. लॉकडाऊनमध्ये मुलं छतावर जाऊन व्यायाम करत होते. त्यांना आता दिलासा मिळत असून, सकाळी व सायंकाळी गर्दी होत आहे.
०००००००००
मेसचालकांचे हाल
सातारा : साताऱ्यात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने तरुण शिक्षण, नोकरीसाठी राहतात. ते जेवणाची सोय घरगुती खानावळीत करतात. मात्र, महाविद्यालये अद्याप बंदच असल्याने मेसचालकांचे हाल होत आहेत. त्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न पडतो.
०००००००००
वीजतारांचे काम सुरू
सातारा : ग्रामीण भागातील वीज वितरण कंपनीच्या तारा ओढून घेण्याचे काम सुरू होते. त्यामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, भविष्यात वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
००००००००
एसटीची मागणी
कार्वे : शाळा, महाविद्यालये सुरू झाली, तरी कऱ्हाड ते कोरेगाव एसटी सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आता शाळा-महाविद्यालय बंद असले, तरी भविष्यात त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एसटी सुरू करण्याची मागणी होत आहे.
०००००००००
अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी
मलकापूर : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या उपमार्गावर वाहनधारकांकडून अस्ताव्यस्तपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे या परिसरात वाहतूककोंडी होऊन वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. ढेबेवाडी फाट्यापासून कोल्हापूर नाक्याकडे येणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहनांची पार्किंग केली जात आहे.
००००००००
जनावरांमुळे नुकसान
बामणोली : सातारा तालुक्यातील कास, बामणोली परिसरात मोकाट जनावरांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. परिसरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यांच्याकडून शिवारात मोठे नुकसान होत आहे.
००००००००००००
वाहनधारक खड्ड्यांमुळे त्रस्त
शिरवळ : शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मुख्य चौकासह अंतर्गत भागातही पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी केली जात आहे.
०००००००००
वेलींचा विळखा
पेट्री : या परिसरातील अनेक भागातील विद्युत खांबांना झाडवेलींनी विळखा घातला आहे. त्यामुळे अनेक वीज जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या झाडवेलींना हटविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
०००००००
अपघातात वाढ
नागठाणे : ग्रामीण भागातील रस्त्याकडेच्या साइडपट्ट्या ठिकठिकाणी खचल्या असून, अपघात होत आहेत. खचलेल्या साइडपट्ट्यांवरून दुचाकी वाहने जात असताना, चालकाचा तोल जाऊन अपघातात वाढ झाली आहे. रस्त्याच्या साइडपट्ट्या भरण्याची मागणी केली जात आहे.
------------
धोकादायक गतिरोधक
सातारा : सातारा-किडगाव मार्गावरील नेले हद्दीत धोकादायक पद्धतीने गतिरोधक ग्रामस्थांनीच तयार केला आहे. या ठिकाणी सुसाट वाहने आदळून, अपघातांचा धोका संभवतो. त्यामुळे गतिरोधक काढून शास्त्रीय पद्धतीने करावा, अशी मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.