कुडाळ : जावळी तालुक्यातील जवळवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने ऑनलाईन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत युवक-युवती व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच वर्षा विलास जवळ यांनी केले आहे.
आषाढी एकादशी व गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थी व युवक-युवतींच्या विचारांना व्यासपीठ देण्याच्या उदात्त भावनेतून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. छोटा गट १४ वर्षाच्या खालील असून, ३ मिनिटांचा वेळ दिला आहे. अनुक्रमे १५०१, १००१, ५०१ रुपये अशा बक्षिसांसह तीनही विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. ‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, मी सरपंच झालो तर, पर्यावरणाचा नाश थांबवा रे, छत्रपती श्री शिवरायांचे आदर्श विचार आणि शिकवण, मातेच्या संस्कारातून भारतमातेला समृध्द करू’ असे विषय या स्पर्धेसाठी देण्यात आले आहेत.
तर मोठा गट वय वर्षे १५ ते २४ असा असून, ५ मिनिटांचा वेळ दिला आहे. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ३००१, २००१, १००१ रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या गटासाठी ‘ काय सांगू या संताचे उपकार मज निरंतर जागविती, खरंच महासत्तेची स्वप्ने सत्यात उतरतील का, भविष्याला दिशादर्शक, वर्तमानाला मार्गदर्शक छत्रपती श्री शिवरायांचा इतिहास, बांधावरच्या बाभळीला लटकलेला कृषिप्रधान भारत, निर्भया, कोपर्डी, भिलवडी थांबणार तरी कधी’ असे विषय देण्यात आले आहेत.