लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात चढ-उतार सुरू असलातरी मागील आठवड्याच्या तुलनेत दरात जवळपास १३०० रुपयांनी वाढ झाली. सलग तीन दिवस क्विंटलला ३८०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. सातारा, जावळी, कोरेगाव, खटाव, माण, वाई, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात शेतीमाल येतो. तर दर गुरुवार आणि रविवारी मालाची अधिक आवक होते. यामध्ये कांदा, बटाट्याची आवक जादा असते.
मागील तीन महिन्यांपूर्वी कांद्याचा क्विंटलचा दर साडेसहा हजारांपर्यंत पोहोचला होता, तर भाजी मंडई, दुकानात कांद्याची किरकोळ विक्री ७० ते ८० रुपये किलोने होत होती. पण, त्यानंतर कांद्याचा दर हळूहळू कमी झाला. बाजार समितीतही दर ढासळला. मात्र, दीड महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याची घोषणा केल्यानंतर दरात थोडी सुधारणा झाली. दर चांगला मिळत असलातरी चढ-उतार सुरूच आहे.
मागील काही दिवसांत सातारा बाजार समितीत कांद्याला एक हजारांपासून ३५०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळत होता, पण बाजार समितीत नवीन कांद्याची आवक वाढल्याने भाव २,३०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आला होता. यामुळे शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण होते. पण, मागील तीन दिवसांपासून दर ३८०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. गुरुवारी २१० क्विंटलची आवक झाली. याला १ हजारांपासून ३८०० रुपयांपर्यंत दर मिळाला.
सातारा बाजार समितीत गुरुवारी ५७ वाहनांतून ५३९ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. आवक चांगली असलीतरी अजूनही अनेक भाज्यांना चांगला दर मिळत नसल्याचे समोर आले आहे. गवारचा दर तेजीत निघाला. गवारला दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. तसेच शेवगा शेंगला ३०० ते ४०० भाव आला. वांग्याला १० किलोला १०० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटो ५० ते ६०, कोबीला ३० ते ४० रुपये भाव आला. टमाटा व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे, तर फ्लॉवरला १० किलोला ६० ते १२० अन् दोडक्याला २०० ते २५० रुपये दर आला.
बटाट्याला क्विंटलला ८०० पासून १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. हिरव्या मिरचीला क्विंटलला ३ ते ४ हजार रुपये भाव आला. आल्याला १ हजार ते १६०० रुपये दर मिळाला. लसणाला क्विंटलला २ ते ८ हजारांपर्यंत भाव आला. वाटाणा अजूनही स्वस्त आहे. ३२०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला.
चौकट :
पालेभाज्यांच्या दरात चढ-उतार
सातारा बाजार समितीत पालेभाज्यांची आवक चांगली होत आहे. पण, दरात सतत चढ-उतार सुरू आहे. गुरुवारी मेथीच्या १८०० पेंडीची आवक झाली. याला शेकडा ४०० ते ६०० रुपये दर मिळाला, तर कोथिंबीरची १७०० पेंडी आली. याला शेकडा दर अवघा ३०० ते ५०० रुपयांदरम्यान मिळाला. पालकला शेकडा २०० ते ४०० रुपये दर आला.
......................................................