सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली, तरी दर मात्र गडगडला आहे. क्विंटलला २५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर कोबी अन् वांगीही स्वस्तच आहेत. त्याचबरोबर डाळींचे भाव कडाडले असून, खाद्यतेलाच्या दरातही तेजी पाहायला मिळत आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. त्यानंतर भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होत जाते.
सातारा बाजार समितीत रविवारी एकूण ४८१ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याची ३०५ क्विंटलची आवक झाली. कांद्याला १ हजारापासून २५०० रुपयांपर्यंत भाव आला. वांग्याला १० किलोला अवघा ५० ते १०० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर टोमॅटोला १० किलोला ६० ते १००, कोबी ३० ते ४० रुपये, फ्लाॅवरला १०० ते १५०, दोडका ३०० ते ३५० आणि कारल्याला २५० ते ३०० रुपये दर आला.
तेलाच्या पाऊचमागे वाढ
मागील दोन महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत आहेत. या आठवड्यातही तेलाच्या एक लिटरच्या पाऊचमागे सरासरी १० रुपयांची वाढ आहे. सूर्यफूल तेलाच्या पाऊचची किंमत १५० ते १६० रुपये झाली; तर सोयाबीन १२५ ते १३० आणि शेंगदाणा तेल पाऊचची किंमत १७० ते १८० आहे. तेल डब्यामागेही किरकोळ वाढ झालेली आहे.
कलिंगडे अनेक ठिकाणी
साताऱ्यात फळांची आवक चांगली आहे. अधिक करून कलिंगडाची आवक आणि विक्री जोरात आहे. शहरात अनेक ठिकाणी विक्री सुरू आहे.
गवार महाग...
बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर कमी झाले असले, तरी काहींचे टिकून आहेत. गवारला तर १० किलोला ४०० ते ६०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यामुळे गवारची किरकोळ विक्री ८० रुपयांपर्यंत पोहोचली, तर ढबू, वाटाणा, भेंडी, पावटा, वालघेवडा यांचे दर स्थिर असल्याचे दिसून आले.
साताऱ्यात अनेक भाज्यांचे दर कमी झाले आहेत. मात्र, गवार, शेवगा यांचे दर अजूनही महागच वाटतात; तर गेल्या आठवड्यात ५० रुपयांवर गेलेला कांदा आता ३० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
- सीताराम पवार, ग्राहक
खाद्यतेलाच्या दरात सतत वाढ होत चालली आहे. याला कारण, पाश्चात मार्केट. या आठवड्यात तेलाच्या एक लिटरच्या पाऊचमागे १० रुपयांपर्यंत वाढ आहे. तसेच तेलडब्यामागेही वाढ आहे.
- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी
सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात पुन्हा उतार आला आहे. त्यामुळे केलेला खर्च कसाबसा मिळेल. पण, इतर पालेभाज्यांचे दरही कमी आहेत. यामुळे नुकसानच होत आहे.
- दिनकर पाटील, शेतकरी