सातारा : रानात शेळ्यांना पाला चारायला गेल्यानंतर शेतातील पाला पेटवल्याने शेजारील उकीरड्यावर चगळाला आग लागून ते पेटल्याच्या रागातून एकावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना गोजेगाव (ता.सातारा) येथे घडली. याप्रकरणी सागर राजेंद्र घोरपडे (रा.गोजेगाव, ता.सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विजय गोरखनाथ घोरपडे (रा.गोजेगाव, ता.सातारा) हे दि. ४ रोजी सागर याच्या रानात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांनी त्या रानातील पाला पेटवून दिला. त्यामुळे संशयित सागर याच्या शेजारीच असलेल्या उकीरड्यावरील चगळाला लाग लागली. त्याचा राग मनात धरून सागर याने विजय यांच्याकडील शेळ्यांना पाला तोडण्यासाठी आणलेल्या कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये विजय हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी हवालदार सावंत हे अधिक तपास करत आहेत.