वर्षा शिवाजी भोसले (रा. ओंड, ता. कऱ्हाड) यांनी याबाबतची फिर्याद कऱ्हाड ग्रामीण पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंड येथील वर्षा भोसले यांची बहीण सीमा यांनी दोन वर्षांपूर्वी एक मशीन खरेदी केली होती. त्यावेळी त्यांना मशीनसोबत एक कुपन मिळाले होते. वर्षा यांनी २१ जानेवारी २०२१ रोजी ते कुपन भरून संबंधित कंपनीने दिलेल्या व्हॉटस्अॅप क्रमांकावर पाठविले. त्यानंतर वर्षा यांच्या मोबाईलवर एक फोन आला. तुम्ही पाठविलेले कुपन आम्ही व्हेरीफाय केले असून तुम्हाला साडेआठ लाखांची लॉटरी लागली असून ते पैसे मिळण्यासाठी तुम्हाला कंपनीकडून सांगितलेली कार्यवाही करावी लागेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार वर्षा यांनी त्यांच्या अकाऊंटवरून संबंधित व्यक्तीने सांगितलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यावर पैसे पाठविले. काही दिवसांनी संबंधित कंपनीतून मॅनेजर वैभव कपूर बोलत असल्याचे सांगून त्या व्यक्तीनेही वर्षा यांना वेळोवेळी आणखी पैसे पाठविण्यास सांगीतले. वर्षा यांनी संबंधितांच्या बँक खात्यावर १ लाख ३६ हजार ६०० रुपये टाकले. मात्र, आणखी पैशाची मागणी होऊ लागल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे वर्षा यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याबाबत कऱ्हाड ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञातांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लॉटरीच्या बहाण्याने दीड लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:07 IST