आजरा : पंचायत समिती स्तरावर बोलावण्यात येणाऱ्या बैठकांना उपस्थित राहणे शासकीय अधिकाऱ्यांना बंधनकारक असताना अधिकारी मात्र बैठकांकडे पाठ फिरवताना दिसतात, अशा अधिकाऱ्यांची गय करू नये, अशा स्पष्ट सूचना आजरा पंचायत समितीचे सभापती विष्णूपंत केसरकर यांनी केली.आजरा पंचायत समितीची आढावा बैठक सभापती केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरूवातीसच अनुपस्थित अधिकाऱ्यांचा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. तहसीलदार व पोलीस निरीक्षक वगळता इतर सर्व अधिकाऱ्यांना सभेस हजर राहणे बंधनकारक असताना अधिकारी गैरहजर राहत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त करून अशा अधिकाऱ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्याचे ठरले.सोहाळे बंधाऱ्यात सद्य:स्थितीस पाणी अडविण्याचे सुरू असलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. सडलेले बरगे वापरून पाणी अडविणे केवळ अशक्य आहे. गेली ४ वर्षे सदर बंधारा गळत आहे. केवळ लघुसिंचनच्या उदासीनतेमुळे हा प्रकार घडत आहे. पाण्याची गळती पूर्ण बंद झाल्याशिवाय ठेकेदाराचे पैसे अदा न करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. दर्डेवाडी शाळा इमारतीचा प्रश्न सदस्य कामिना पाटील यांनी उपस्थित केला. शाळा इमारतीचे निर्लेखन करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी सांगितले. जून २०१६ पर्यंत तालुक्यातील वीजवितरण कंपनीची प्रलंबित कनेक्शन देण्यात येतील, असे वीजवितरणने स्पष्ट केले.रस्त्याशेजारील झुडपांचा प्रश्नही सदस्यांनी उपस्थित केला. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून झुडपे त्वरीत काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. तर बहुतांशी गावांची स्मशानशेड गावापासून दूर व गैरसोयीच्या ठिकाणी असून यापुढील स्मशानशेड गावाजवळ बांधण्यास प्राधान्य देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. चर्चेत उपसभापती दीपक देसाई, सदस्य तुळशीराम कांबळे, निर्मला व्हनबट्टे, अनिता नाईक यांनी भाग घेतला. गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)प्रगतिपथ म्हणजे काय ?अधिकारीवर्गाकडून नेहमी कामे प्रगतिपथावर आहेत, असे सांगितले जाते. पण, प्रगतिपथ म्हणजे काय ? प्रत्येकवेळी ‘प्रगतिपथावर’ असा शब्द वापरला जातो. पण, पूर्ण झाली असे कधी म्हणणार, असा प्रश्न सभापतींनी उपस्थित केला.
बैठकीस दांड्या मारणाऱ्या अधिकाऱ्यांची गय नाही
By admin | Updated: December 2, 2015 00:44 IST