सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या यंदा चौपटीने वाढली असून, येत्या तीन महिन्यांत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. गतवर्षी मार्च महिन्यामध्ये केवळ १३ रुग्ण होते, तर यंदा याच महिन्यामध्ये तब्बल अडीच हजार रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा हा वेग पाहता आतापासूनच नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात गतवर्षी २३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर महिन्याच्या शेवटअखेर केवळ १३ रुग्ण सातारा जिल्ह्यात आढळून आले होते, तर यंदा याउलट परिस्थिती आहे. मार्च महिन्यातच अडीच ते तीन हजारने कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा कोरोनावाढीचा वेग चौपटीने वाढत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नागरिकांनी केलेले दुर्लक्ष, कोरोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि सर्वकाही प्रशासनावर सोडून दिल्याने ही कोरोनाची आकडेवारी वाढली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांनी सोशल डिस्टसिंग आणि तोंडाला मास्क लावणे सोडून दिले. कोरोना कायमचा गेला, या आविर्भावात अनेकांनी सार्वजिक ठिकाणी बेमालूमपणे वावर सुरू केला, तर काही जणांनी पार्ट्याचे आयोजन केले. गर्दीमध्ये कोणीही तोंडाला मास्क लावला नाही. त्यामुळे कोरोना सातारा जिल्ह्यात पूर्णपणे आटोक्यात आलाच नाही तर वाढलेलाच पाहायला मिळाला.
गतवर्षी कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर पहिल्यांदा त्या रुग्णाच्या कोणकोण संपर्कात आले याची माहिती घेतली जात होती. त्यामुळे त्या रुग्णाच्या संपर्कात आलेले इतरजण कोरोनापासून चार हात लांब होते. परंतु, आता ही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोना बाधिताचा निकट सहवासात नेमके कोण आले, याचा तपास तर सुरू नाहीच, शिवाय नागरिकांकडूनही आरोग्य विभागाला अचूक माहिती दिली जात नाही. त्यामुळे ही संख्या चार पटीने वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
मार्च महिन्यातच ही परिस्थिती असेल तर येत्या तीन ते चार महिन्यांत काय परिस्थिती असेल याचा विचार केला तर चिंता वाटते असेही वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत.
चौकटः लसीचा वेग वाढविणे हाच एकमेव पर्याय
जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी लसीचा वेग वाढविणे गरजेचे आहे. तीन महिन्यांत जिल्ह्यामध्ये १ लाख २६ हजार जणांना डोस देण्यात आले आहेत. हा वेग सध्या वाढविण्यात आला असून, दिवसाला आठ ते दहा हजार जणांना लस दिली जात आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा लसीचा टप्पा पाच लाखांच्या वर जाईल असा अंदाज प्रशासनाला आहे.
कोट : नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. सोशल डिस्टंसिंग आणि तोंडाला मास्क लावावा. हे नियम काटेकोरपणे पाळले तर कोरोनापासून आपण नक्कीच दूर राहाल. यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.
डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक सातारा