उंब्रज : वाहनाने प्रवास करताना चालकाला डुलकी लागली तरी ते प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. हे आपण पाहत आलो आहे; परंतु प्रवास करताना झोप आली म्हणून गाडी सुरक्षित ठिकाणी लावून एकाने एक डुलकी काढली. त्याच कालावधीत दुचाकी चोरीला गेली. नुकतीच अशी घटना उंब्रज येथे घडली. ही डुलकी सुमारे ६० हजारांना पडली आहे. सोनगीरवाडी (शिवाजीगनर), ता. वाई येथील हणमंत कांतिलाल पवार (वय २८) हा आपल्या मित्रासह दुचाकीवरून चिपळूणला गेला होता. दि. १७ एप्रिलला ते दोघे परत चिपळूणहून वाईकडे निघाले होते. रस्त्यात पाऊस आला. पावसात भिजल्यामुळे दोघेही गारठले व झोप आली. त्यामुळे त्यांनी दुचाकी (एमएच ११ बीएस ३०३८) ही उंब्रज बसस्थानकाच्या परिसरात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास उभी केली. दुचाकी लॉकही केली. बसस्थानकाचा आसरा घेऊन तेथेच डुलकी काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, रात्रगस्तीच्या पोलिसांनी दोघा मित्रांना विचारले. त्यांनी सत्यस्थिती सांगितली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना बसस्थानकात आश्रय घेऊ दिला. त्यानंतर पोलीस निघून गेले. दोघांनाही झोप लागली. मात्र, सकाळी उठून बघातात, दुचाकी जागेवर नाही. त्यांनी शोध घेतला; पण ती कोठेही आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. हवालदार राजेश वीरकर तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
डुलकी पडली ६० हजारांना !
By admin | Updated: April 19, 2015 00:38 IST