चाफळ : ग्रामस्वच्छता अभियानाचा डंका सर्वत्र वाजवला जात असला तरी हा सारा खटाटोप करत असताना चाफळसह विभागातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयात अद्यापही शौचालये नसल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाच्या आदेशाची शासकीय लोकांकडूनच पयमल्ली होताना दिसून येत आहे. चाफळ विभागात सुमारे २० ते २२ स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी सुमारे ९० ते ९५ टक्के ग्रामपंचायती संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत निर्मल झाल्याची शासन दप्तरी नोंद आहे. त्यांची बक्षिसेही त्या-त्या गावांना मिळालेली आहेत. परंतु, या बक्षिसपात्र बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतागृहेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना उघड्यावर जावे लागत आहे. संपूर्ण गावांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या या ग्रामपंचायतींमधून जनतेने काय बोध घ्यायचा? हा संशोधनाचा विषय होऊन बसला आहे. गाव स्वच्छ झाले पाहिजे, हे खरे असले तरी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून अभियानाची खरी सुरूवात होते. त्या ग्रामपंचायत कार्यालयात शौचालय असणे क्रमप्राप्त आहे. चाफळ विभागातील काही ग्रामपंचायती याला अपवाद ठरत असल्या तरी बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये लाखो रूपये खर्च करून बांधलेली इमारत आहे; पण त्यामध्ये शौचालय नाही ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. ‘घर तेथे शौचालय’साठी शासनाचे अधिकारी घरोघरी जाऊन प्रबोधन करतात. प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करतात. त्याच पध्दतीने शासनाचे आदेश असतानाही ग्रामपंचायत तेथे शौचालय बांधण्यास चालढकल का केली जाते; असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर) पदाधिकाऱ्यांचीही अनास्थाविभागातील अनेक गावे निर्मल झाली. परंतू ग्रामपंचायतींची कार्यालये निर्मल कधी होणार? याची चर्चा सुरू आहे. आजही ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांच्या घरी शौचालये नसल्याचे निदर्शनास येत आहे. तर काही कारभारी घरात शौचालय असतानाही उघड्यावर जात असल्याचे चित्र विभागात पहावयास मिळत आहे.
स्वच्छतागृह नाही; गावं मात्र निर्मल !
By admin | Updated: June 10, 2015 00:31 IST