कोळकी : नीरा-देवधर प्रकल्पग्रस्तांची महसुली अधिकारी व दलाल यांच्या संगनमताने मिरगाव पुनर्वसन गावठाणातील भूखंड हडपून त्यावरील घर पाडून घरातील साहित्य चोरून नेऊन दहा लाखांचे नुकसान झाल्याने याची चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नीरा-देवधर प्रकल्पग्रस्त धामनुशी (ता. भोर) येथील लोकांचे मिरगाव (ता. फलटण) येथे पुनर्वसन करून त्यांना घरासाठी जागा व जमीन असा भूखंड दि. ३१ जुलै २००० रोजी फलटण प्रांताधिकारी यांच्यामार्फत वाटप करण्यात आला. त्यानंतर प्रकल्पग्रस्त ज्ञानोबा तान्हू धामनुशे व मधुकर लक्ष्मण मालुसरे यांनी शासनाकडून अधिकृत कब्जेवहिवाट देऊन भूखंड क्रमांक ५०/५१ व मधुकर मालुसरे भूखंड क्रमांक ३३ व ४२ या ठिकाणी पक्के घर बांधून वास्तव करीत होते; परंतु प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांसाठी अद्यादेशानुसार वीज, पाणी, रस्ते आदी अत्यावश्यक सुविधा लोकांना उपलब्ध करू न दिल्याने प्रकल्पग्रस्तांंचा दैनंदिन रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिल्याने ते कामधंद्यासाठी गावाकडे परतले.
याचाच फायदा घेऊन मिरगाव येथील स्थानिक दलाल नवनाथ नारायण सरक व महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी संगनमताने मौजे हिरडोशी येथील प्रकल्पग्रस्त खातेदार सोपान गोपाळ मोरे यांच्या नावे भूखंडाचा बोगस आदेश काढून खरेदीखत करून सात-बारावर नोंद करण्यात आली असून, आराखडा बाह्यवाटप कशाआधारे करण्यात आले, याची जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, तसेच सिमेंट, विटांचे पक्के घर पाडून घरातील साहित्य चोरून नेऊन दहा लाखांचे नुकसान झाल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. जिल्हा पुनर्वसन विभागाने याची त्वरित दखल घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, अशी प्रकल्पग्रस्तांनी मागणी केली आहे.
(चौकट)
पदाधिकाऱ्यांनी मांडला अडचणीचा लेखाजोखा...
संबंधित घटनेची माहिती नीरा-देवधर प्रकल्प विभागाला देण्यात आल्यानंतर नीरा-देवधरचे उपविभागीय प्रकल्प अभियंता भावेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणी प्रकाश साळेकर, ज्ञानोबा धामुण, अरुण मालुसरे आदी प्रकल्पग्रस्त पदाधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांंच्या अडचणीचा लेखाजोखा सांगितला. यावर सविस्तर माहिती घेऊन त्वरित अन्याय झालेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचे आश्वासन उपविभागीय प्रकल्प अभियंता भावेकर यांनी दिले.
चौकट...
प्रशासकीय विभागात समन्वयाचा अभाव..
२०१४ पर्यंत प्रकल्पग्रस्तांंचे पुनर्वसन भूखंड वाटप हे फलटण प्रांताधिकारी यांच्याकडे होते. त्यानंतर जिल्हा पुनर्वसन अधिकारी सातारा पुनर्वसन वाटप वर्ग करण्यात आल्याने या प्रशासकीय विभागात समन्वयाच्या अभावामुळे माहिती न घेता भूखंड क्रमांक ५०/५१ वाटपाचा दुबार आदेश जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी सोपान मोरे यांच्या नावे काढून तो नवनाथ नारायण सरक या व्यक्तीला विकला.
फोटो आहे...