कऱ्हाड : प्रलंबित मागण्यांसदर्भात अंगणवाडीतार्इंनी असहकार आंदोलनास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार सेविका व मदतनीस या आंदोलनात सहभागी असून, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत प्रतिमहिन्याचा अहवाल देणार नसल्याचे तसेच कोणतीही बैठक अथवा प्रशिक्षणाला हजर राहणार नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या काही मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी दि. १ एप्रिलपासून असहकार आंदोलन करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. त्यानुसार अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी असहकार आंदोलनास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ४ हजार ५१५ अंगणवाड्या असून, त्यामध्ये सुमारे नऊ हजार सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. त्यांना ज्ञानदानाबरोबरच अंगणवाडी भागातील शून्य ते सहा वयोगटांतील बालकांचा सर्व्हे, त्यांचे वजन, कुपोषित बालकांची संख्या, त्यांचा आहार, जन्म-मृत्यूच्या नोंदी, शाळाबाह्य मुलांची माहिती, गर्भवती महिलांची संख्या, त्यांचा आहार, बालकांच्या लसीकरणाची माहिती एकत्रित करून त्याचा अहवाल प्रत्येक महिन्याला द्यावा लागतो. तसेच तालुका व जिल्हास्तरावर होणाऱ्या बैठका तसेच प्रशिक्षणालाही हजर राहावे लागते. असहकार आंदोलनानुसार आता अंगणवाडी सेविका व मदतनीस आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत अहवाल सादर करणार नाहीत. तसेच बैठका व प्रशिक्षणालाही हजर राहणार नाहीत. शासनाने एप्रिल २०१४ पासून सेविकांना ९५० व मदतनिसांना ५०० रुपयांप्रमाणे दिलेली मानधनवाढ त्वरित द्यावी, सेविका व मदतनीस यांना मे महिन्यात उन्हाळी सुटी द्यावी, सुटीच्या कालावधीत बालकांना कोरडा आहार देण्याची परवानगी द्यावी तसेच किमान वीस दिवसांची वैद्यकीय रजा मिळावी, अशी सेविका व मदतनीस यांची मागणी आहे. (प्रतिनिधी) ५अंगणवाडी कर्मचारी प्रामाणिकपणे ज्ञानदान त्याचबरोबर इतर कामे करतात. मात्र, त्यांच्या मागण्यांबाबत शासन गंभीर नाही. शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, यासाठी कृती समितीने असहकार आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.- विजया शिंदे, सदस्याकृती समिती घटक संघटना
नऊ हजार अंगणवाडीतार्इंचा ‘असहकार’
By admin | Updated: April 3, 2015 00:36 IST