भुर्इंज : ‘मला शिकण्याची खूप इच्छा होती. मात्र, वडिलांच्या निधनाने मला जुन्या अकरावीनंतर लग्न करावे लागले. लग्नानंतर शिकायचे होते; पण आमची सून कॉलेजात पाठविणार नाही, असा नातेवाइकांनी आग्रह धरला. पुढे शिक्षण सुरू होण्यासाठी दहा वर्षे गेली. त्या दहा वर्षांनंतर शिक्षणाची संधी मिळताच बीए, एम. ए. एम फील. करून आता लवकरच पीएच. डी. होईन, यातून सांगायचं काय तर शिक्षणाची आस कधी सोडू नका. शेळीसारखं जगू नका, कारण शेळीसारखे जगाल तर बळी जाल. त्यामुळे वाघासारखे जगा,’ असे आवाहन माजी आमदार कांता नलवडे यांनी भुर्इंज येथे केले. येथील ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या वतीने पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा विकृतांना फक्त फाशीची शिक्षा देऊन उपयोग होणार नाही. शिवरायांनी रांझ्याच्या पाटलाला ज्या पद्धतीने धडा शिकवला, तसेच शासन व्हायला हवे. कारण असे रांझ्याचे पाटील आता गल्लोगल्ली झाले आहेत. यावेळी मुंबई महापालिकेच्या नगरसेविका समिता कांबळे, राजनंदा जाधवराव, नंदकुमार खामकर, पद्माताई भोसले, आदी उपस्थित होते. जयवंत पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. भैय्यासाहेब जाधवराव यांनी आभारमानले. (वार्ताहर)विविध क्षेत्रात महिलांना संधीज्येष्ठ कवी नायगावकर म्हणाले, ‘पूर्वीपेक्षा आज स्त्रियांना विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व गाजविण्याची संधी मिळत आहे. हा जो बदल आहे, त्या बदलासाठी महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांनी अंगावर दगड आणि शेणाचे गोळे झेलले आहे, ज्योतिबा फुलेंना जिवंतपणी स्वत:ची अंत्ययात्रा पाहावी लागली. लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, अशा अनेकांच्या समाजसुधारणेचे प्रयत्न त्यासाठी कामी आले आहेत. यावेळी अशोक नायगावकर यांनी ठरलेली मानधनाची रक्कम नाकारून ती ज्ञानियांच्या चरणी अर्पण करत असल्याचे सांगितले. मुलांना योग्य वयात योग्य संस्कार मिळणे आवश्यक आहेत, तरच जीवनाची वादळवाट ते यशस्वी चालू शकतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांनी पारायण सोहळ्यात केले.
शिक्षणाची आस कधी सोडून नका : नलवडे
By admin | Updated: January 21, 2015 23:53 IST