दहिवडी : दहिवडीत सलग वीस वर्षे दिवंगत वाघोजीराव पोळ यांची सत्ता होती. नगरपंचायत झाल्यानंतर गतवेळच्या पहिल्याच निवडणुकीत अंतर्गत कुरघोडी व बंडखोरांना थोपविण्यात अपयश आले. यामुळे सत्ता गमावलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा वाघोजीराव पोळ यांच्या अनुपस्थितीत किल्ला लढवावा लागणार आहे. अंतर्गत कुरघोड्यांनी गमावलेली सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करणार आहे.
दहिवडीचे राजकारण अनेक वर्षे दिवंगत वाघोजीराव पोळ व ॲड. भास्करराव गुंडगे या दोन्ही काका यांच्या गटामध्ये होत असे. आमदार गोरे यांची राजकारणात इन्ट्री झाली, त्यावेळी आमदार गोरे व वाघोजीराव पोळ गटाची सत्ता आली. त्या पाच वर्षांत अनेक सत्तांतरे झाली. दहिवडी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. ॲड. भास्करराव गुंडगे व आमदार जयकुमार गोरे यांचे एकत्रित पॅनेल, तर राष्ट्रवादीतून वाघोजीराव पोळ व शेखर गोरे यांचे पॅनेल उभे राहिले. शेखर गोरे व पोळ यांचे तीन चार जागेवरून शेवटपर्यंत मनोमीलन झाले नाही. त्या ठिकाणी पक्षाअंतर्गत बंडाळी झाली. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली.
आमदार गोरे यांचे अकरा, तर राष्ट्रवादीला पाच व एक राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष असे ६ उमेदवार निवडून आले. आमदार गोरे व ॲड. गुंडगे यांचे स्पष्ट बहुमत असल्याने गुंडगे यांच्या स्नुषा साधना गुंडगे यांना प्रथम नगराध्यक्षाची संधी मिळाली. त्या तीन वर्षे नगराध्यक्षा राहिल्या. त्यानंतर सत्ताधारी गटातील प्रत्येकालाच पदाची हाव सुटली. प्रत्येकजण खुर्चीसाठी धावू लागला. एका वर्षात तीन नगराध्यक्ष बदलले गेले.
दहिवडी नगरपंचायतीने पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला; मात्र ठोस असे काम करता आले नाही. नगरपंचायतीची नूतन इमारत मंजूर असताना काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. अपुरी जागा, सुविधांची वानवा त्यामुळे नगरपंचायतीला आगही लागली होती. कचरा उचलणे, अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती व पिण्याचे पाणी या सुविधा नगरपंचायतीने चांगल्या दिल्या आहेत. मात्र रिंगरोड, नाना-नानी पार्क, क्रीडासंकुल, कचरा डेपो हे प्रश्न मार्गी लावण्यात यश आले नाही.
चौकट
विरोधकही शांतच
घरपट्टी, पाणीपट्टी, बाजार भाडे व शासकीय अनुदान याव्यतिरिक्त कोणतेही नवीन उत्पन्न वाढवण्यात यश आले नाही. अनुभव येण्याच्या अगोदरच खुर्ची बदलण्याचा परिणामही विकासावर दिसून येतो. विरोधी बाकावरूनही आक्रमक पवित्रा दिसला नाही. सर्व काही आलबेल आहे, असेच काहीसे चित्र पाच वर्षे दिसले.
चौकट
शेखर गोरेंच्या भूमिकेवर गणितं
आमदार गोरे यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख यांचे पॅनेल असणार आहे. शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांची भूमिका नेमकी काय असणार, त्यावर या निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे. पहिल्या निवडणुकीत प्रभाग पध्दतीने मतदान झाले होते. यावेळीही प्रभाग पध्दतच राहणार असल्याने नवीन प्रभाग रचनेत जास्त फरक पडेल, असे वाटत नाही. गोरे यांचे दहिवडीत संघटन मजबूत आहे.
चौकट
झालेल्या चुका टाळाव्या लागणार
राष्ट्रवादीला पहिल्यांदाच स्वर्गीय वाघोजीराव पोळ यांच्या अनुपस्थितीत लढावे लागणार आहे. याशिवाय मागील झालेल्या निवडणुकीत झालेल्या चुका टाळाव्या लागणार आहेत; तर शेखर गोरे यांना सामावून घेऊन एकास एक फाईट झाल्यास निवडणूक चुरशीची होणार, हे निश्चित आहे.
चौकट
एकूण नगरसेवक १७
पक्षीय बलाबल
भाजप ११
राष्ट्रवादी ६
फोटो ०४दहिवडी नगरपंचायत