पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पुन्हा पावसाचा जोर वाढला असून, दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. नवजा येथे चोवीस तासांत तब्बल २२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणात सध्या ८८.३३ टीएमसी पाणीसाठा झाला असून, दरवाजे तीन फुटांवरच स्थिर आहेत. त्यातून १८ हजार ७६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे.कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत नवजा येथे २२४, महाबळेश्वरमध्ये ११९, कोयनेत १२० मिलिमीटर पाऊस पडला. पावसाची सरासरी चार हजार मिलिमीटरने ओलांडली आहे. कोयना धरण व्यवस्थापनास एकीकडे धरणातील पाणी साठवण पूर्ण क्षमतेने करायचे असून, दुसरीकडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला. धरणात दि. १५ आॅगस्टपर्यंत ९५ ते १०० टीएमसी पाणी साठवून ठेवण्याचे कौशल्य अभियंत्यांना दाखवावे लागणार आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागू नये ही दक्षताही धरण व्यवस्थापनाला बाळगावी लागणार आहे. (प्रतिनिधी)चौकट :भाटघरचे स्वयंचलित ४५ दरवाजे उघडलेशिरवळ : नीरा नदीवरील भाटघर धरणाचे स्वयंचलित ४५ दरवाजे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडले. धरण ९७ टक्के भरले असून, धरणात २३ टीएमसी साठा झाला आहे. धरणाच्या दरवाजातून २० हजार ४३० क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात करण्यात येत आहे. या हंगामात प्रथमच दरवाजे उघडले आहेत. दरम्यान, धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पंधरा मिनिटांची चाचणी घेतल्यानंतर दरवाजे बंद केल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे.भाटघरमुळे जिल्ह्यातील पूल पाण्याखाली शिरवळ : भाटघर धरणातून सोडलेले पाणी वीर धरणात जाते. त्यामुळे वीर धरणातून विसर्ग केल्यानंतर आलेल्या पाण्यामुळे खंडाळा तालुक्यातून पुरंदर तालुक्यातील वीर येथे जाणारा पूल पाण्याखाली जातो. भाटघर, नीरा-देवघर तसेच गुंजवनी या धरणांतील पाणीही नीरा नदी पात्रात मिसळत असल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे पालखी सोहळ्यात ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यासाठी पाडेगावजवळ बांधलेले कट्टेही पाण्याखाली जातात. धरणातून सोडले जात असलेल्या पाण्याचे प्रमाण आणखी दोन दिवस स्थिर ठेवावे लागणार आहे. पावसाचे प्रमाण कमी जास्त होत आहे. धरणातील आवकही मोठी आहे. - ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण
नवजामध्ये तब्बल २२४ मि.मी. पाऊस!
By admin | Updated: August 9, 2016 23:48 IST