कऱ्हाड : येथील गाडगे महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक पार पडली. कोरोनाकाळात राष्ट्रीय सेवा योजनेवर महत्त्वाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन यावेळी शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये यांनी केले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. पाटील होते. यावेळी प्रा. नेताजी सूर्यवंशी, प्रा. माधुरी कांबळे, प्रा. वंदना किशोर, विद्या पाटील, योगेश कस्तुरे, रोहिणी शेळके, रमेश पोळ उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी डॉ. तानाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. अभय पाटील यांनी आभार मानले. कोमल कुरुंदकर यांनी सूत्रसंचालन केले.
ढेबेवाडीत पोलिस पाटलांचा सत्कार
कऱ्हाड : धरणग्रस्त गावात अडकलेल्या ग्रामस्थांच्या सुटकेसाठी येथील पोलीस व महसूल प्रशासनाने राबविलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन चांगली कामगिरी बजावल्याबद्दल वाझोलीचे पोलीस पाटील विजय सुतार व मत्रेवाडीचे पोलीस पाटील भगवान मत्रे यांचा पोलीस ठाण्यातर्फे सत्कार करण्यात आला. जिंती विभागातील वाड्यावस्त्यांतील ग्रामस्थांची पोलीस व महसूलसह ग्रामपंचायतीच्या सहकार्याने यशस्वी सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. या मदतकार्यात विजय सुतार व भगवान मत्रे यांनी सहभाग घेतला होता. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
विंग येथे प्रगती जाधव यांचा सेवेबद्दल सत्कार
कऱ्हाड : विंग (ता. कऱ्हाड) येथील आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्यसेविका प्रगती जाधव यांचा ग्रामपंचायतीतर्फे सन्मान करण्यात आला. कोरोना काळातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना गौरविण्यात आले. सरपंच शुभांगी खबाले यांच्या हस्ते झालेल्या सत्कारप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, कृष्णाचे संचालक बबनराव शिंदे, उपसरपंच सचिन पाचपुते, सेवा सोसायटीचे अध्यक्ष हिम्मत खबाले, सदस्य विठ्ठल राऊत, शंकर ढोणे, विकास माने, बाबूराव खबाले, माजी उपसरपंच अलका पवार, माजी सदस्य भागवत कणसे, ग्रामविकास अधिकारी किसन रोंगटे आदी उपस्थित होते.
शेरे येथे निनाई मंदिराचा कलशारोहण उत्साहात
कऱ्हाड : शेरे (ता. कऱ्हाड) येथील ग्रामदैवत निनाई मंदिराचा शिखर जीर्णोद्धार व कलशारोहण समारंभ उत्साहात पार पडला. ‘चांगभलं’चा गजर व भक्तिमय वातावरणात हा समारंभ पार पडला. मंदिराचा परिसर गत दहा वर्षांत विकसित झाला आहे. मंदिराच्या शिखराचा जीर्णोद्धार करणे आवश्यक होते. गतवर्षी मुंबईस्थित शेरे येथील ग्रामस्थ खेडकर कुटुंबीयांनी शिखर जीर्णोद्धाराची जबाबदारी घेतली. ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करत या कामाला गती दिली. भक्तिमय वातावरणात जीर्णोद्धार व कलशारोहण समारंभ पार पडला. वडगाव हवेली येथील सिद्धेश्वर मंदिरातील राम महाराज यांच्या उपस्थितीत कलश स्थापना करण्यात आली.