वाई : वाई तालुक्यातील देवरुखवाडी, कोंढावळे येथे गुरूवार, दि. २२ रोजी भूस्खलन होऊन सात घरे जमीनदोस्त झाली होती. त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला.
अतिवृष्टीमुळे वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये झालेल्या नुकसानाची माहिती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिली. त्यानंतर आमदार पटोले हे वाईमध्ये दाखल झाले. वाईमधून नावेचीवाडी, भोगाव आणि वरखडवाडी येथे जाताना ओढ्याचे पाणी रस्त्यावरुन वाहत होते. या वाहत्या पाण्यातूनच ते वेलंग येथे पोहोचले. या भागातील बाधितांच्या वेदना जाणून मदत करण्याची सूचना त्यांनी केली.
त्यांनी वेलंग येथेच दुर्घटनेची माहिती घेतली. यावेळी अतिवृष्टीमुळे जांभळी, कोंढावळे येथील देवरुखवाडी येथील भयंकर परिस्थितीची माहिती बापूसाहेब शिंदे यांनी दिली. बाधित लोकांना जास्तीत जास्त मदत करावी आणि संपूर्ण देवरुखवाडीचे पुनर्वसन करा, अशी मागणी त्यांनी केली. दरवर्षी अतिवृष्टीमुळे रस्त्यांवरील पूल वाहून जातात. त्यामुळे संपर्क तुटतो. संपूर्ण पश्चिम भागातील पूल हे आरसीसीमध्ये करावेत, अशी मागणी विराज शिंदे यांनी केली.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, काँग्रेसचे वाई तालुकाध्यक्ष रवींद्र भिलारे, युवकचे तालुकाध्यक्ष प्रमोद अनपट, बापूसाहेब शिंदे, राजेंद्र शेलार, प्रताप देशमुख, कल्याणराव पिसाळ, महेश भणगे, राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांशी मोबाईलवरुन संवाद
घटनेची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर पटोले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना फोनवरून सूचना केल्या. यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पश्चिम भागात लवकरच दौरा करुन बाधित लोकांचे पुनर्वसन तसेच योग्य तो मोबदला मिळावा, यासाठी तत्काळ पावले उचलावीत, अशा सूचना केल्या.