कोरेगाव : कोरेगाव शहरासाठी नगरपंचायत स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने शनिवारी घेतला आहे. शासनाने या संदर्भात अधिसूचना काढली असून, ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे प्रकल्प अधिकारी किरणराज यादव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सायंकाळी यादव यांनी पदभार स्वीकारला. सहा महिन्यांपासून होणार-होणार म्हणून चर्चेत असलेल्या नगरपंचायतीच्या स्थापनेचा मुहूर्त अखेर शनिवारी साधण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फाईलवर स्वाक्षरी झाल्यानंतर नगरविकास विभागाने पुढील सोपस्कार पूर्ण केले आहेत. या विभागाचे उपसचिव ए. आर. परशुरामे यांनी अधिसूचना प्रसिध्द केली आहे. शासनाने दि. १ मार्च २०१४ रोजी राजपत्रामध्ये उद्घोषणा प्रसिध्द केली होती. त्यावर ३० दिवसांच्या आत आक्षेप मागविलेले होते. त्यानंतर दि. ५ फेब्रुवारी २०१५ रोजी शासनाने जुन्या उद्घोषणेत सुधारणा करत आक्षेप मागविण्याचा कालावधी दि. ६ मार्च २०१५ पर्यंत वाढवलेला होता. या कालावधीत आलेल्या हरकती व आक्षेपांचा विचार करुन शासनाने नगरपंचायत स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी सायंकाळी नगरविकास विभागाने या संबंधीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविल्यानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी किरणराज यादव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. हा आदेश घेऊन यादव यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास कोरेगाव येथे येऊन ग्रामविकास अधिकारी अरुण गायकवाड यांच्याकडून पदभार स्वीकारला. (प्रतिनिधी)
कोरेगावला अखेर नगरपंचायतीचा दर्जा
By admin | Updated: March 6, 2016 00:46 IST