मलकापूर : विनामास्क फिरणाऱ्या २२ जणांवर, तर सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या १५ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करत नगरपालिकेने २० हजार ८५० रुपयांचा दंड वसूल केला. मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी स्वत: व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून शनिवारी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर व दुकानांमध्ये गर्दी करणाऱ्या व्यावसायिकांवर धडक कारवाई केली.
सध्या शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, बाधितांचा आकडा वाढत आहे. तरीही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. नियमांची पायमल्ली करत कोरोना प्रादुर्भाव वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत. तालुक्यातून अनेक लोक शहरात वेगवेगळ्या कामासाठी येत असतात. त्यामुळे मलकापूर भागात गर्दी वाढत आहे. यातील बरेचजण विनामास्क असतात. यावर शनिवारी पालिकेच्या विशेष पथकाने कारवाईचा बडगा उगारला. डी. मार्ट, सिग्नेचर वाइन शॉप, शिंदे लिकर्स या मोठ्या व्यावसायिकांसह अन्य १२ दुकानांवर दंडाची कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला. ढेबेवाडी फाटा येथे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. मलकापुरातील मुख्य रस्ता, मलकापूर फाटा, कृष्णा रुग्णालय परिसर, ढेबेवाडी फाटा ते आगाशिवनगरमधील नागरिकांवर व दुकानात गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली. सायंकाळी सहा ते रात्री आठपर्यंत ही विशेष मोहीम सुरू होती.
शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर विनामास्क दिसणाऱ्यांना अडवले जात होते. विशेष म्हणजे गर्दीत, बाजारपेठेत फिरताना मास्क न वापरणारे पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होते. या मोहिमेमध्ये मुख्याधिकारी मर्ढेकर यांच्यासह ज्ञानदेव साळुंखे, रामचंद्र शिंदे, राजेश काळे, उमेश खंडाळे, रमेश बागल, अधिकराव कदम, मनोहर पालकर, शशिकांत पवार, रामदास तडाखे, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला होता.
चौकट
दुसऱ्यांदा सापडल्यास दुकाने सील
नगरपालिकेच्या कारवाईत दुसऱ्यांदा सापडल्यास दुकाने सील करण्याची समजही संबंधित व्यावसायिकांना मुख्याधिकारी मर्ढेकर यांनी दिली.
फोटो - मलकापुरात शनिवारी येथील पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांसह दुकानांमध्ये गर्दी करणाऱ्या व्यावसायिकांवर धडक दंडात्मक कारवाई केली. (छाया : माणिक डोंगरे)