फलटण : फलटण शहरातील पेठ बुधवार, शुक्रवार, शनिनगर, जुने पोस्ट ऑफिस, भैरोबागल्ली, स्वामी मंदिर परिसर वगैरे भागात नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून होणारा पाणी पुरवठा वेळेवर, योग्य दाबाने, पुरेशा प्रमाणात होत नसल्याबद्दल नगरपरिषद दखल घेत नसल्याने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रत्नप्रभा हिंगे यांनी दिला आहे.
प्रभाग क्रमांक ६ व १० मध्ये गेल्या दोन वर्षांपासून योग्य दाबाने, पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याबाबत नगरपरिषद प्रशासनास निवेदने, पत्राद्वारे, समक्ष भेटून सांगून, सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. मात्र त्याची दखल घेऊन कोणतीही सुधारणा झाली नसल्याने सोमवार, दि. १ फेब्रुवारी रोजी शंकर मार्केट येथील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात बेमुदत उपोषणास बसणार असल्याची पूर्वसूचना हिंगे यांनी लेखी पत्राद्वारे नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना दिली आहे. या पत्राच्या प्रति जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आणि सर्व नगरसेवक, नगरसेविकांना पाठविल्या आहेत. या पत्रावर नागरिक, पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.