सातारा : गर्भवती महिलेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. ७ सप्टेंबरपर्यंत हा कार्यक्रम राबविला जाणार असून, यात गर्भवतींसह त्यांच्या कुटुंबियांचे प्रबोधन करण्याच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत ‘मातृवंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळता सर्वांना पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यांत पाच हजार रुपये दिले जातात. सातारा जिल्ह्यात मागील पाच वर्षांत जिल्हा परिषदेने ८६ हजार २१० महिलांना याचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांच्या खात्यावर आत्तापर्यंत ३७ कोटी ३२ लाख ७८ हजार रुपये जमाही करण्यात आले आहेत.
आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडीसेविका घरोघरी जाऊन लाभार्थी महिलांची कागदपत्रे जमा करतात. मातृवंदना सप्ताहामध्ये या योजनेच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.
१) तीन टप्प्यात मिळणार पैसे
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी मातांना त्यांच्या बँक खात्यावर थेट पाच हजारांची मदत होणार आहे. ही रक्कम त्यांना तीन टप्प्यात मिळणार आहे.
२) पात्रतेचे निकष काय?
शासकीय नोकर असलेल्या माता वगळून सर्वांना त्यांच्या पहिल्या अपत्यासाठी हा लाभ मिळणार आहे. त्यासाठी गर्भवती मातेचे, पतीचे आधारकार्ड आवश्यक आहे. आधार संलग्न बँकेचे खाते, गरोदरपणाची शासकीय यंत्रणेत नोंद, तपासणी, बाळाचा जन्मनोंदणी दाखला, माता व बाळांचे लसीकरण या बाबी पूर्ण केल्यास हा लाभ मिळणार आहे.
३) लाभासाठी कोठे करायचा संपर्क
गर्भवती महिलांनी आपल्या जवळच्या शासकीय यंत्रणेत आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात जावे.
४) कोट
पंतप्रधान मातृवंदना योजना केंद्रस्तरावर राबविली जात आहे. जिल्ह्यातील ८६ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच पुढील काळात लाभार्थी महिलांनी या योजनेत नोंदणी करून घ्यावी, यासाठी जनजागृती करण्याचाही आमचा मानस आहे.
- रोहिणी ढवळे, महिला बाल कल्याण अधिकारी