शिरवळ/लोणंद : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडाळा तालुका प्रशासन सतर्क झाले असून खंडाळा तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या शिरवळ व लोणंद येथे दोन टप्प्यात अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी लागू करण्याचा आदेश खंडाळा सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिला. हा आदेश बुधवार, दि. ३१ मार्चपर्यंत लागू असणार आहे.
खंडाळा तालुक्यात व शेजारील पुणे जिल्ह्यासह कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे वावर होऊन कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे गरजेचे आहे. यादृष्टीने खंडाळ्याच्या सहायक जिल्हाधिकारी यांनी खंडाळा तालुक्यात मोठी बाजारपेठ म्हणून असलेल्या शिरवळ व लोणंद या दोन ठिकाणी दोन टप्प्यामध्ये सायंकाळी पाच ते नऊ व सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. यामध्ये हॉटेल्स, खाद्यगृहे, दुकानांत क्षमतेच्या पन्नास टक्के ग्राहकांना प्रवेश द्यावा. प्रवेश देताना मास्कचा वापर अनिवार्य असून मास्क न वापरणाऱ्यांवर पाचशे रुपये दंड आकारण्यात यावा. दुकानांमध्ये ग्राहकांमध्ये सहा फुटांचे अंतर राखणे बंधनकारक आहे.
संचारबंदीचा आदेश लागू केल्यानंतर आव्हाळे यांनी शिरवळ व लोणंद याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी उपसरपंच सुनील देशमुख, मंडलाधिकारी शिवाजी मरभळ, तलाठी सागर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश परखंदे, ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव, पोलीस हवालदार प्रकाश फरांदे, संतोष ननावरे, सचिन शेलार, प्रशांत वाघमारे उपस्थित होते.
चौकट
पोलिसांची त्रेधातिरपीट
शिरवळ येथे सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी संचारबंदी दोन टप्प्यात लागू केली. आदेशाची अंमलबजावणी करताना कमी संख्याबळामुळे शिरवळ पोलिसांची त्रेधातिरपीट उडाली. पोलीस कर्तव्य बजावत असले तरी ग्रामपंचायतीकडून वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचे दिसून आले.
छायाचित्र- शिरवळ, ता.खंडाळा याठिकाणी संचारबंदी लागू केल्यानंतर व्यापाऱ्यांनी वेळेनंतर दुकाने बंद केल्याने नागरिकांची वर्दळ कमी प्रमाणात झाली. (छाया-मुराद पटेल,शिरवळ)