मोबाइल हे संपर्काचं साधन; पण सध्या हे केवळ साधन उरलेलं नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यात मोबाइल हा अविभाज्य घटक बनला आहे. त्यातही ‘स्मार्टफोन’कडे प्रत्येकाचा कल असून त्याचा संपर्कापेक्षा अवांतर वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. तरुणाई या अवांतर मोबाइल वापरात पुढच्या पावलावर आहे. व्हिडिओ, गेम्स, चॅटिंग, सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीमध्ये तरुण वर्ग एवढा गुंतला आहे की, मोबाइलशिवाय राहणं ही कल्पनाही त्यांना अस्वस्थ करते आणि निश्चितच हे चिंताजनक आहे.
मोबाइलविषयी अप्रूप असण्याचाही एक काळ होता. त्याकाळी गरज म्हणून मोबाइल वापरला जायचा. कालांतराने मोठेपणासाठी त्याचा ‘दिखावा’ सुरू झाला. आणि आता तर अनेकांना मोबाइलचं व्यसन जडल्याची परिस्थिती आहे. अगदी कळत्या वयापासूनच मोबाइल हातात मिळत असल्यामुळे त्याची सवय अनेकांना लागली आहे. शालेय जीवनातच त्याचा अवांतर वापर सुरू होतो आणि कालांतराने हा वापर वाढतच जातो. तरुणांमध्ये हे प्रमाण तुलनेने जास्त आहे. महाविद्यालयीन युवक, युवती चक्क मोबाइलच्याच प्रेमात पडल्याची परिस्थिती असून क्षणासाठीही ते त्यांचा मोबाइल इतरत्र ठेवायला तयार नाहीत. तासनतास ते मोबाइलमध्ये गुंग असतात. कॉलेज कॅम्पस असो, बसमधील प्रवास असो अथवा घरातील हॉल, प्रत्येक ठिकाणी युवक, युवतींच्या हातात मोबाइल असल्याचे दिसते. त्याचा वापरही अमर्याद असून त्याचा मूळ वापर कशासाठी करायचा, हेच अनेक जण विसरून गेलेत. मोबाइलमध्ये असलेल्या विविध ‘फिचर्स’ आणि ‘ॲप’मध्ये तरुणाई पूर्णपणे गुरफटल्याचे दिसत असून ही परिस्थिती विचार करायला लावणारी आहे.
अनेक वेळा मानसिक स्थिती ढासळण्यास तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्यास मोबाइल कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, तरीही त्यातून कोणीही बोध घेताना दिसत नाही. पुढच्यास ठेच लागली की, मागच्याने शहाणे व्हावे, असे म्हटले जाते. मात्र, मोबाइलच्या अति वापराने काही जण मानसिकता ढासळून वेडे झाले तरी कोणीही त्यातून बोध घेत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
- संजय पाटील
- चौकट
‘पर्सनल स्पेस’ हवीच; पण मर्यादाही गरजेच्या!
मोबाइलमध्ये खासगी आयुष्यातील काही गोष्टी असतात. फोटो, व्हिडिओ, मेसेज, ड्राफ्ट यासह अनेक वैयक्तिक बाबींचा संग्रह त्यामध्ये असतो. त्यामुळे मोबाइल ही युवक, युवतींची ‘पर्सनल स्पेस’ आहे, हे मान्य; पण मोबाइलबाबत त्यांनी मर्यादाही ओळखणे गरजेचे आहे. त्याचा वापर आपण कोणत्या कारणासाठी आणि किती वेळ करतोय, याचा विचार प्रत्येक युवक आणि युवतींनी करायलाच पाहिजे.
- चौकट
तरुणाईचा मोबाइल वापर
चॅटिंग : २७ टक्के
कॉल : २३ टक्के
व्हिडिओ : १८ टक्के
गेम : १९ टक्के
इतर : १३ टक्के
- चौकट
सर्व काही कुलूपबंद
अपवाद वगळता युवक आणि युवतींच्या मोबाइलची ‘स्क्रीन’ कधीही खुली नसते. ‘फिंगरप्रिंट लॉक’, ‘फेस लॉक’, ‘पॅटर्न लॉक’ अथवा ‘पिन लॉक’ टाकून स्वत:शिवाय इतर कोणाचीही मोबाइलमधील ‘एण्ट्री’ रोखलेली असते. मात्र, या विविध ‘लॉक’चे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटेही आहेत, याचा विचार कोण करणार? दुर्दैवाने अपघात झालाच तर मदतकर्त्यांना फोन असूनही नातेवाइकांशी संपर्क साधता येणारच नाही.
फोटो : ०४संडे०१, ०२
कॅप्शन : प्रतीकात्मक
................................................................