प्रमोद सुकरे - कऱ्हाड त्तरचे बंडखोर आमदार बाळासाहेब पाटील अन् विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आनंदराव पाटील यांच्यातील मैत्री सध्या वाढतच चाललीय़ त्यांच्या या मैत्रीला वेळोवेळी केलेल्या मदतीची झालर असल्याने त्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे़ पण, त्यामुळे दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांच्यात तितकीच संभ्रमावस्थाही दिसत आहे़ आनंदराव पाटील यांनी मूळच्या कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात दिवंगत पी़ डी़ पाटील व आमदार बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात प्रत्येकी एकवेळ निवडणूक लढविली होती; पण त्यांना यश आले नाही़ त्यानंतर मात्र नानांनी उत्तरचा नाद सोडून दिला, मग तत्कालीन नगरसेवक अरुण जाधवांनी नशीब आजमावले तेव्हा काँटे की टक्कर झाली; पण अरुण दादांचा ‘काटा’ कोणी काढला, याबाबत आजही तर्कवितर्क लढविले जातात़ दरम्यान, सहा वर्षांपूर्वी तालुक्याच्या राजकारणात एक महाआघाडी एकवटली़ सर्वांचा समान शत्रू या मद्द्यावर आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मदनराव मोहिते, आनंदराव पाटील, डॉ़ सुरेश भोसले आदी नेते एकत्रित आले़ अन् बाजार समितीच्या निवडणुकीत ऐतिहासिक सत्तांतर झाले; पण त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या आघाडीला ‘दृष्ट’ लागली; अन् त्याचे परिणाम तालुक्याच्या राजकारणात दिसूनही आले़ पण, त्या परिस्थितीतही आनंदरावांनी ‘मैत्री’ जपल्याचीच चर्चा आजही आहे़साडेतीन वर्षांपूर्वी राज्यात उलथा-पालथ झाली अन् महाराष्ट्रात ‘पृथ्वीराज’ अवतरले; पण त्यानंतर झालेल्या पालिका अन् पंचायत समिती निवडणुकीतही आघाडीतील बिघाडीच दिसली़ बारामतीकरांची राजकीय ‘टगेगिरी’ बाळासाहेबांच्या माध्यमातून कऱ्हाडकरांना पाहायला मिळाली़ तरीही महाआघाडी अभेद्य राहावी म्हणून ज्येष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरूच होते़ दोन महिन्यांपूर्वी आनंदराव पाटील विधानपरिषदेचे आमदार झाले़ त्यांचे कऱ्हाडात जंगी स्वागत झाले़ त्यांची मिरवणूक शहरातून दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी पाहोचली़ अभिवादन केल्यानंतर दुसऱ्या साहेबांना अभिवादन करायला ते विसरले नाहीत़ त्यांची मिरवणूक दिवंगत पी़ डी़ पाटील यांच्या निवासस्थानाकडे पोहोचली़ त्यांना अभिवादन केल्यानंतर आमदार आनंदराव पाटलांचा सत्कारही तेथे करण्यात आला़ गत आठवड्यात बाजार समितीतील कार्यक्रमात अजितदादांनी पाठ फिरवली, तरी आमदार बाळासाहेब पाटील समर्थकांसह हजर होते़ पुतळा अनावरणप्रसंगी आनंदरावांनी बाबांना बाळासाहेबांना पुढे घ्यायला आवर्जून सांगितले़ अन् मुख्यमंत्र्यांनीही त्यांना बरोबर घेतले़ काल-परवा बाळासाहेबांना आनंदराव पाटलांनी एका हॉटेलात शुभेच्छा दिल्या अन् सोशल मीडियावर फोटोही झळकू लागला़ त्यामुळे अनेक राजकीय स्थित्यंतरानंतरही त्यांची मैत्री वाढतच चाललेली दिसते़ त्यांची ही वाढती मैत्री कार्यकर्त्यांच्यात मात्र संभ्रम निर्माण करीत आहे़ कऱ्हाडचे मुख्यमंत्री असतानाही नगरपरिषद अन् पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही आमदारांचे समर्थक समोरासमोर भिडले़ अन् आपणच उगा वाईटपणा घेतला नाही ना? असा प्रश्न आता त्यांना सतावत असावा़ म्हणे, उत्तरेत ‘धैर्य’ खचतंयमुख्यमंत्री चव्हाणांनी कऱ्हाडला छप्पर फडके निधी दिला़ त्यात दक्षिण उत्तर भेदही केला नाही़ उत्तरेत सुमारे शंभर कोटींच्या आसपास निधी मिळाल्याचे सांगितले जाते़ सहाजिकच काँग्रेस बळकटीला त्याचा फायदा झालाय; मात्र जुन्या मैत्रीला नव्याने उजाळा देण्याचा दोन आमदारांचा प्रयत्न विधानसभेवर डोळा ठेवून असणाऱ्या उत्तरेतील काँग्रेस कार्यकर्त्यांचे ‘धैर्य’ कमी करत नाही ना? हा चिंतनाचा विषय आहे़
बाळासाहेबांचा निर्धार काय?पंधरा दिवसांपूर्वी कऱ्हाड तालुक्यातील तांबवेत अजित पवारांच्या हस्ते एका पुलाचे भूमिपूजन झाले़ मात्र, कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित नव्हते़ तसेच साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्याकडेही त्यांनी पाठ फिरवली़ त्यामुळे आनंदराव पाटलांशी मैत्री अन् मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांशी सलगी साधणाऱ्या अपक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांचा नेमका काय ‘निर्धार’ आहे़ हे पाहण्यासाठी थांबावेच लागेल़