मलटण : नागपंचमीला स्त्रिया विविध पारंपरिक खेळ खेळतात तर तरुण अवघे आकाश मुठीत घेऊन पतंग उडवतात. पारंपरिक दोऱ्याला काच व तत्सम साहित्य लावून मांजा तयार केला जात असे. बदलत्या काळात चायनीज मांजावर बंदी असताना तो विकला जात आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून हा मांजा कापून अनेक मुले व वाहनचालक जखमी होतात. वडजल येथील व्यापारी उमेश चव्हाण हे दुचाकीवरून फलटणहून वडजलकडे निघाले असता दुपारी चार वाजता फलटण स्मशान भूमीजवळ पतंगाचा चायनीज मांजा कापून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर फलटण येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मांजा कापून याच घटनास्थळावर मागील काही वर्षात अनेक लोक जखमी झाले आहेत. याच ठिकाणी एका दुचाकीवर पुढे बसलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याचे फलटणने अनुभवले असताना दरवर्षी अशा घटना होतच आहेत. विशेष म्हणजे याच ठरावीक स्थळी या घटना घडण्याचे प्रमाण जास्त आहे. पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग शहराजवळून जात असल्यामुळे पतंग महामार्गावर येतात व अपघात होतात. वास्तविक चायनीज मांजा विक्रीवर बंदी असताना तो सहज विक्रीसाठी उपलब्ध होतो. इतक्या घटना घडल्यावरदेखील नागरिकही यातून बोध घेत नाहीत.
फलटण पोलीस अशा मांजा विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करत असल्याचे दिसले तरीही काही ठिकाणी अशी विकी सुरू होती. शहरालगत असणाऱ्या उपनगरात हा मांजा उपलब्ध होत आहे. दिवसभर अशा किरकोळ घटना घडल्याचे लोक सांगत असले तरी मागील घटना आणि उमेश चव्हाण यांना जीवावर बेतलेली दुखापत यातून नागरिक काही बोध घेतील का असा प्रश्न आहे.
130821\img_20210812_205918021.jpg
चायनीज मांजा कापल्याने वडजल येथील व्यापारी गंभीर जखमी झाले