सातारा : घरात पतीकडून मारहाण, मानसिक छळ अशा स्वरूपाच्या तक्रारी नेहमीच समोर येतात. आता मात्र, पत्नीकडूनच घरात छळ होत असल्याच्या तक्रारीही पुरुष मंडळी करू लागली आहे. पोलीस ठाण्यासह भरोसा सेलमध्ये जानेवारी ते मे या दरम्यान एकूण ८३ पुरुषांनी पत्नीविरोधात तक्रार करत मदत मागितली आहे.
कोरोनाच्या काळात पोलीस ठाण्यात, तसेच भरोसा सेलकडे महिलांसह पुरुषांच्याही तक्रारी वाढल्या आहेत. जानेवारी ते मे दरम्यान ८३ पुरुषांनी पत्नीविरोधात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, सर्वच तक्रारींचा निपटारा पोलिसांनी केला आहे. शहरासह ग्रामीण भागातूनही तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. कोरोना काळात नोकरी, व्यवसाय ठप्प झाल्याने बहुतांशी जणांना घरात बसण्याची वेळ आली. सहवास वाढला, तशी भांडणेही वाढली असल्याचे पोलीस ठाण्यातील आकडेवारीवरून दिसून येत आहे.
चाैकट : या आहेत पतींच्या तक्रारी..
माझे सासू-सासरे पत्नीचे कान भरवितात अन् ती ते सांगेल तसेच वागते.
सतत माहेरी जाण्याचा हद्द असतो.
आइ-वडिलांपासून वेगळे राहण्याचा हट्ट.
पत्नी जाॅब करते. त्यामुळे मला व मुलांना वेळ देत नाही. मुलांनाही मलाच सांभाळावे लागते.
पत्नी मला समजून घेत नाही. पत्नी तिच्या जुन्या मित्रांच्या सतत संपर्कात राहते.
पत्नीच्या शाॅपिंगमुळे मी कंगाल झालोय.
चाैकट :
आर्थिक टंचाई आणि अतिसहवास
कोरोनामुळे नोकरी, व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने, बहुतांशी घरात आर्थिक कारणांमधून वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच लाॅकडाऊनमुळे पती, पत्नी जास्त काळ सहवासात राहिल्याने शुल्क कारणातून वादाचे प्रसंग उद्भवत आहेत, असेही पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरून दिसून येते.
चाैकट : समुपदेशाने पुन्हा संसार जोडले
पोलीस ठाण्यात व भरोसा सेलमध्ये जेवढ्या पुरुषांनी तक्रारी केल्या, तितक्या पुरुषांचे संसार पुन्हा सुखात सुरू झाले. पती, पत्नीला कार्यालयात बोलावून त्यांचे समुपदेशन करत, त्यांचा संसार पुन्हा सुरळीत केला, तर चालू वर्षात पुरुषांच्या दाखल ८३ तक्रारींपैकी सर्वच तक्रारी सामोपचाराने मिटविल्या. याला भरोसा सेल आणि इतर पोलिसांचे सहकार्य लाभले.
कोट :
पत्नी काहीही कारण नसताना सतत वाद घालते. लाॅकडाऊनमुळे नोकरी गेली आहे. पुण्यात होतो. आता साताऱ्यात आलोय, तर घरात सारखा वाद सुरू आहे. मला घटस्फोट दे, अशी पत्नी म्हणतेय. म्हणून मी पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे. तिचं एकदा तरी समुपदेशन व्हायला हवं.
- एक पीडित पती, सातारा.