कऱ्हाड/मलकापूर : टेंभू प्रकल्पाची उंची वाढविल्यामुळे कृष्णा व कोयना नदीपात्रातील पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत आहे. बुधवारी (दि. ६) नदी प्रदूषणाबाबत चर्चा करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी मलकापूर नगरपंचायतीसह कऱ्हाड पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, या बैठकीत पर्यावरण मंत्र्यांसह जलसंपदा विभागाचे सचिव, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव, प्रादेशिक अधिकारी, पाठबंधारे, विभागाचे अधीक्षक अभियंता, जिल्हा खनिकर्म अधिकारी, ओगलेवाडीचे कार्यकारी अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकारी, दोन्ही पालिकांचे अधिकारी व मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहेत.प्रदूषण नियंत्रण मंडळ व काही नागरिकांच्या निर्देशानुसार मलकापूर नगरपंचायत व कऱ्हाड पालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांना कृष्णा व कोयना नदीपात्रातून पाणीपुरवठा होतो. येथील टेंभू योजनेची उंची वाढविल्यामुळे नदीपात्रातील साठवण क्षेत्रात सांडपाणी मिसळून पात्रातील पाणी दूषित होत आहे. याची दखल घेऊन बुधवारी पर्यावरण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीत नदी प्रदूषणांची कारणमीमांसा तपासून त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश पर्यावरण खात्यांकडून ई मेलद्वारे संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीचे तातडीने आयोजन केल्यामुळे कृष्णा-कोयना नदीपात्रातील प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना व निर्णय होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्र्यांसह आमदारांची उपस्थितीमलकापूर व कऱ्हाड शहराच्या दृष्टीने हा नदी प्रदूषणाबाबतचा हा विषय महत्त्वाचा आहे. हे गांभीर्य ओळखून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, पर्यावरणमंत्र्यांच्या वरिष्ठ स्वीय सहायकही बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
कऱ्हाडच्या पाण्यासाठी मंत्रालयात बैठक
By admin | Updated: April 6, 2016 00:06 IST