सातारा : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने सातारा पालिकेने येत्या शुक्रवारी (दि. २२) बैठक बोलाविली आहे. मूर्तिकार आणि गणेशमूर्तींच्या स्टॉलधारकांना या बैठकीस आमंत्रित करण्यात आले असून, या बैठकीवर आधारित येत्या २७ तारखेला होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाणार आहे.गणेश विसर्जनामुळे होणारे जल आणि वायूप्रदूषण, त्याचा नागरिकांना होत असलेला त्रास यामुळे गेल्या वर्षी मंगळवार तळे परिसरातील नागरिकांचा क्षोभ दिसून आला होता. हा मुद्दा उचलून धरत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला होता. ‘लोकमत’च्या आवाहनास प्रतिसाद देताना सुमारे दीड हजार सातारकरांनी शाडूच्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली होती. अनेकांनी घरच्या घरी विसर्जन करून ती माती तुळशीला घातली. तथापि, गणेशमूर्ती बनविणारे मूर्तिकार आणि स्टॉलधारक यांनी ‘आम्हाला पूर्वीच कल्पना द्यायला हवी होती,’ असा सूर आळवला होता. त्यावेळी कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी ‘असे असल्यास पुढील वर्षासाठी ही तेरा महिने आधी दिलेली नोटीस समजा,’ असे म्हणून २०१५ च्या गणेशोत्सवात पर्यावरणालाच सर्वाधिक महत्त्व दिले जावे, असे स्पष्ट संकेत दिले होते. (प्रतिनिधी)
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेने उद्या बोलावली बैठक
By admin | Updated: May 21, 2015 00:02 IST