लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरालगत असलेल्या माजगावकर माळ आकाशवाणी झोपडपट्टी येथील कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर बनला होता. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी या भागात घंटागाडी सुरू केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
माजगावकर माळ आकाशवाणी केंद्र झोपडपट्टी हा परिसर त्रिशंकू भाग म्हणून ओळखला जात होता. गेल्या ३५ वर्षांपासून येथील रहिवाशी मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित होते. सातारा पालिकेची हद्दवाढ झाल्याने हा परिसर आता पालिकेत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे येथील येथील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी आता पालिकेवर आली आहे.
दरम्यान, या भागातील कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर बनला होता. कचरा गाडी येत नसल्याने कचरा टाकायचा कोठे? असा प्रश्न नागरिकांपुढे उभा ठाकला होता. रिपाइं व फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने या समस्येबाबत मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदन देऊन घंटागाडी सुरू करण्याची मागणी केली होती. मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या भागात तातडीने घंटागाडी सुरू करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.