फलटण : फलटण तालुक्यात कोरोनाची आकडेवाडी वाढत असताना जनतेत मास्क व सोशल डिस्टन्सबद्दल गांभीर्य राहिलेले नाही. अनेकांच्या तोंडावरचा मास्क हनुवटीवर आला अन् तालुक्यात कोरोना वाढू लागला आहे. त्यामुळे धास्ती आणखी वाढली आहे.
गेल्या दहा दिवसांत तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
फलटण तालुक्यात मागील पाच ते सहा महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. दररोज सरासरी दहा रुग्ण सापडायचे. राज्यात तसेच सातारा जिल्ह्यात सर्वत्र कोरोना रुग्ण वाढत असताना फलटण तालुक्यात रुग्णसंख्या खूपच कमी होती. जनताही निर्धास्त होती. त्यामुळे मास्क वापरण्याचे प्रमाण खूप कमी झाले होते. लग्नसराई समारंभ यामध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. अनेकांकडे जेवणावळी सुरू झाल्या होत्या. जनतेमध्ये गांभीर्य नसल्याने हळूहळू कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत जाऊन आता फलटण तालुक्यात जवळपास दररोज तीसच्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडू लागले आहेत.
सुरुवातीच्या काळात कोरोनाबद्दल जनतेमध्ये भीती होती. मात्र, कोरोना झाला तर बरा होतो या मानसिकतेतून जनता निर्धास्त होऊ लागली आहे. विशेषत: तरुण पिढी मास्क वापरताना दिसत नाही. पोलीसही ठराविक ठिकाणीच मास्क नसल्यावर कारवाई करताना दिसत आहेत. संपूर्ण फलटण शहरात पोलिसांनी रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. प्रशासनाने कठोर उपाय योजना केल्या तर काही प्रमाणात कोरोनाला आळा बसू शकतो. आठवडी बाजार आणि दररोजच्या मंडईमध्ये अनेकजण विना मास्क भाजी खरेदी करण्यासाठी येत आहेत. काही भाजी विक्रेतेही मास्क वापर करताना दिसत नाहीत. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
फलटण नगरपालिकेने सर्व दुकानदारांची कोरोना टेस्ट करण्याचे सुरू केले असून, त्याला दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अनेक दुकानांमध्येही सोशल डिस्टन्सचे पालन होताना दिसत नाही.
दरम्यान, फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, यामुळे कोरोनाचा धोका वाढलेला आहे. नागरिकांनी मास्क वापरावे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.