सातारा : खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी, फलटण बाजार समितीत अजूनही मोठ्या प्रमाणात धान्य आवक नाही. ज्वारी, बाजरी, गहू आदींची आवक टिकून असून दरही स्थिर आहे. सध्या बाजार समितीत बाजरीला दर कमी असून ज्वारीला क्विंटलला साडेतीन हजारापर्यंत भाव मिळत आहे.
भारत देश कृषिप्रधान आहे. येथील शेतकरी विविध पिके घेतो. उत्पादित शेतीमाल स्थानिक स्तरावर तसेच काही दुकानदारांना विकण्यात येत, तर पुढे दर मिळेल, या आशेने काही मालाची साठवणूक करण्यात येते. त्यानंतर काहीवेळा हा शेतीमाल बाजार समितीत नेऊन विकला जातो. सातारा जिल्ह्याचा विचार करता, येथील खरीप हंगाम मोठा असतो. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत खरीप क्षेत्र आहे. खरीप हंगामाची तयारी करताना शेतकरी साठवून ठेवलेला शेतीमाल बाजार समितीत विकतो. त्यातून आलेल्या पैशातून बियाणे, खते आदींची खरेदी करण्यात येते. छोटे शेतकरी खरीप हंगामापूर्वी बाजार समितीत अधिक करून शेतीमाल आणतात.
फलटण बाजार समितीत दर रविवारी धान्य खरेदी आणि विक्री होते. या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, खंडाळा, तर पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातूनही धान्य येते.
..........
आठवड्याला होणारी सरासरी आवक क्विंटलमध्ये...
ज्वारी २००, बाजरी ५०, गहू २५०, मका १२५
............
प्रतिक्रिया
कोणाला काय वाटते...
फलटण बाजार समितीत दर रविवारी धान्य खरेदी व विक्री व्यवहार होतात. खरीप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी धान्य घेऊन येत आहेत. पण, अजूनही मोठ्या प्रमाणात आवक नाही. तसेच धान्याचे दर स्थिर आहेत.
- शंकर सोनवलकर,
सचिव, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती
............
खरीप किंवा रब्बी हंगाम संपल्यानंतर शेतकरी उत्पादित केलेला शेतीमाल काही प्रमाणात बाजारात विकतो. तसेच काही साठवणूक करून दर आल्यानंतर विकतो. सध्या शेतकरी खरीप हंगामाची तयारी करू लागलाय. बाजार समितीत धान्य आणत आहे. बाजार समितीत सध्या तरी धान्य दर टिकून आहे.
- चेतन घडिया, धान्य खरेदीदार
.........................
शेतकरी म्हणतात...
दरवर्षी शेतकरी खरीप व रब्बी हंगामात विविध पिके घेतो. जादा उत्पन्न मिळाले की त्याची विक्री करतो. कोणी जागेवर धान्य विक्री करतो, तर काहीवेळा कोणत्याही बाजार समितीत धान्य विक्रीसाठी नेले जाते. सध्या बाजार समितीत दर वाढलेला दिसत नाही. तरीही धान्यविक्री करून खरिपाची तयारी करावी लागणार आहे.
- ठकाजी काळे, शेतकरी
..................................
गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे उत्पादनही चांगले मिळाले. आतापर्यंत काही धान्य विकले आहे, तर काही प्रमाणात धान्याची साठवणूक केली होती. पण, आता खरीप हंगाम जवळ आला असल्याने दर काहीही मिळो, धान्य विकून चार पैसे गोळा केले पाहिजेत.
- साधू जाधव, शेतकरी
फोटो दि.०६बाजार समिती फोटो नावाने...
फोटो ओळ :
फलटण बाजार समितीत धान्यासह इतर शेतीमालाची आवक चांगली होत आहे.
\\\\\\\\\\\\\\\\\\\