उंब्रज / तारळे : पिण्यासाठी पाणी न दिल्याच्या कारणावरून एकाने मामेभावाच्या डोक्यात सळीचा घाव घालून खून केला़ तारळे विभागातील धुमकवाडी येथे काल, रविवारी रात्री ही घटना घडली़ याप्रकरणी रामा बाबू पवार (वय ५०) याला उंब्रज पोलिसांनी अटक केली आहे़ सोपान विष्णू हेलम (वय २२, मूळ रा़ सोनारी, ता़ महाड, जि़ रायगड, सध्या रा़ धुमकवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यातील काही कुटुंबांनी उदरनिर्वाहासाठी धुमकवाडी येथे वास्तव्य केले आहे़ या कुटुंबांपैकी सखाराम जाधव हे मासेमारी करून मुरूडच्या बाजारात विक्री करतात़ सखाराम यांचा मेहुणा सोपान हेलम हासुद्धा धुमकवाडीतील वडजाईदेवी मंदिरालगत झोपडी घालून वास्तव्यास आहे़ काल रात्री सोपान दाजी सखारामच्या घरी जेवण्यासाठी आला होता़ सखाराम व सोपान जेवण करीत असताना नजीकच झोपडीत राहणारा रामा पवार तेथे आला़ त्याने बाहेरूनच सखारामला हाक मारली़ सखाराम बाहेर आल्यानंतर त्याने त्याच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले़ मात्र, झोपडीत पाणी नसल्याचे सखारामने सांगितले़ चिडलेल्या रामाने सखारामला लोखंडी सळीने मारहाण केली़ त्यामध्ये सखाराम किरकोळ जखमी झाला़ वादावादीनंतर रामा व सखाराम आपापल्या झोपडीमध्ये निघून गेले़ मात्र, काही वेळानंतर आपल्या दाजीला केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी सोपान रामाच्या झोपडीजवळ गेला़ त्याने रामाला बाहेर बोलावून जाब विचारला असता चिडलेल्या रामाने सोपानच्या डोक्यात सळीचा घाव घातला़ त्यामुळे गंभीर जखमी होऊन अतिरक्तस्राव झाल्यामुळे सोपान जागीच बेशुद्ध पडला़ सखाराम व त्याच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी सोपानला तातडीने कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात नेले़ मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला़ सखाराम जाधव याने दिलेल्या फिर्यादीनुसार उंब्रज पोलिसांत रामा पवार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक मारुती पाटील तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)
पिण्याच्या पाण्यासाठी मामेभावाचा निर्घृण खून
By admin | Updated: June 24, 2014 01:40 IST