सातारा : शहरालगत असणाऱ्या धनगरवाडी येथे पतीला मारहाण होत असताना, ती सोडविण्यात गेलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड मारून तिला जखमी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकाला अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वाती रवी बडेकर (वय २७, रा.धनगरवाडी, ता.सातारा. मूळ रा. चंदननगर, ता.सातारा. यांचे पती रवी घरासमोर उभे असताना गणेश तिथे आला. त्याने ‘माझ्या गाडीला रिक्षाने ठोकर मारून नुकसान केले आहेस,’ असे खोट सांगतच, रवी यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी गणेश याने रवीच्या कानाखाली मारून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी हे भांडण सोडविण्यास स्वाती गेल्या असता, त्यांच्या डोक्यात गणेशने दगड मारला. यात त्या जखमी झाल्या. या प्रकरणी स्वाती यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गणेशवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक भोसले हे करत आहेत.