सातारा : विधानसभा निवडणुकीनंतर सातारा पालिकेच्या सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी झालेल्या सर्व सभापती निवडी बिनविरोध झाल्या. नियोजन समितीचे सभापतिपद वगळता उर्वरित समित्यांच्या सभापतिपदी महिला नगरसेवकांची निवड झाल्याने पालिकेच्या सभापती निवडीवर महिलांचे वर्चस्व राहिले. तर महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्यपदी ‘साविआ’चे पक्षप्रतोद अॅड. डी. जी. बनकर, विजय बडेकर आणि जयेंद्र चव्हाण यांची निवड झाली.सभापती निवडी म्हटल्या की, यापूर्वी अनेकजण इच्छुक असायचे; परंतु यावेळेस इच्छुकांची संख्या फारशी नव्हती. शुक्रवारी सकाळी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत प्रत्येक समितीच्या सभापतिपदासाठी एकेक अर्ज आल्याने सर्व निवडी बिनविरोध घोषित करण्यात आल्या. पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीठासीन अधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी या निवडी जाहीर केल्या. त्यात नियोजन समितीच्या सभापतिपदी ‘नविआ’चे भालचंद्र निकम, बांधकाम समितीच्या सभापतिपदी ‘साविआ’च्या मनीषा भणगे, आरोग्य समितीच्या सभापतिपदी ‘नविआ’च्या अंजली माने, पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी ‘साविआ’च्या स्वाती आंबेकर तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी ‘नविआ’च्या वैशाली राऊत यांची बिनविरोध निवड झाली. तर महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्यपदी अॅड. डी. जी. बनकर, विजय बडेकर आणि ‘नविआ’चे जयेंद्र चव्हाण यांची निवड झाली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट, नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिनाज शेख, विरोधी पक्षनेते अॅड. बाळासाहेब बाबर, नगरसेवक कल्याण राक्षे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रसारमाध्यमांना अटकावयापूर्वी सभापती निवडीला प्रसारमाध्यमांना सभागृहात प्रवेश दिला जात होता. मात्र पहिल्यांदाच शुक्रवारी झालेल्या निवडीवेळी प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारला. अर्ध्या तासानंतर निवडी जाहीर करण्यात आल्या.
सातारा पालिकेत महिलाराज
By admin | Updated: December 26, 2014 23:44 IST