सातारा : दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एकता मारूती चव्हाण (वय १६, रा. महागाव, ता. सातारा) हिने आज (गुरुवारी) दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे महागाव परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत माहिती अशी की, एकता साताऱ्यातील एका शाळेत शिकत होती. मंगळवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. दहावीत ती ५१ टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली; परंतु अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती नाराज होती. घरात ती कोणाशीही बोलायची नाही. ती नाराज असल्याचे घरातल्यांना समजल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिची समजून घातली होती. मात्र, तरीही ती नाराजच होती. दरम्यान, गुरुवारी दुपारी घरातील सर्वजण एका लग्नसमारंभाच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी एकताने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर घरातील लोक परत आले, तेव्हा त्यांना एकताने आत्महत्या केल्याचे पाहून जबरदस्त मानसिक धक्का बसला. गावातील काही नागरिकांच्या मदतीने घरातल्यांनी एकताला जिल्हा शासकीय रुग्णालयात तत्काळ दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)