शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टी गमावूनही त्यानं शोधला प्रकाशाचा मार्ग

By admin | Updated: June 27, 2016 00:40 IST

एका जिद्दीची संघर्षगाथा : नांदवळ येथील दिनकर झगडेंचा दुकानचालक ते टेलिफोन आॅपरेटरपर्यंतचा यशस्वी प्रवास

प्रदीप यादव -- सातारा -डोळे आल्याचं निमित्त झालं अन् घरच्यांनी देवाचं आहे म्हणून अंधश्रद्धेपोटी दुर्लक्ष केलं. दृष्टी कमजोर झाली. गावठी उपचार केले अन् त्यातच दृष्टी कायमची गमवावी लागली. चौथीनंतर शिक्षणाची वाट अंधारली; पण उमेद हारली नाही. दृष्टी गमावूनही त्यानं प्रकाशाची वाट शोधली अन् त्या वाटेवर स्वार होऊन तो शिकला. स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपडत राहिला. आज तो स्वत:च्या पायावर उभा आहे खंबीरपणे. साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तो टेलिफोन आॅपरेटर म्हणून नोकरी करत आहे. ही कुठल्या चित्रपटाची कथा नाही तर कोरेगाव तालुक्यातील नांदवळ येथील दिनकर झगडे यांच्या जिद्दीचा संघर्षमय प्रवास आहे.कोरेगाव तालुक्यातील नांदवळ या खेडेगावात एका सामान्य कुटुंबात दिनकर झगडे यांचा जन्म झाला. गावातच प्राथमिक शिक्षणाचे धडे घेत असताना चौथीत असताना त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पण आई-वडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. दिनकर झगडे आपली दृष्टी कशी गेली, याचं चित्र ‘लोकमत’जवळ रेखाटत होते. घरातील लोक अडाणी. डोळ्याचं दुखणं त्यांना कळलं नाही. कालांतराने रात्रीचे दिसणे कमी झाले. पोराला रातआंधळेपणा आला म्हणून घरच्यांनी देव-देव करण्यास सुरुवात केली. रातांधळेपणा म्हणजे देवाचं काहीतरी आहे, या अंधश्रद्धेपोटी त्यांनी दर शनिवारी मला गावातून भाकरी मागायला लावली. बायामाणसं मला कुंकू लावून ओवाळत. ते कुंकू डोळ्यात जाऊन त्रास आणखीनच वाढला. मग गावठी उपचार सुरू झाले; पण यश मिळाले नाही. अंधश्रद्धेपोटी माझी दृष्टी कायमची गेली. वयाच्या अकराव्या वर्षी दिनकर झगडे यांना अंधत्व आलं आणि बालवयातच त्यांच्या जीवनात अंधार दाटला. शिक्षण बंद झालं. घरच्या लोकांनी पुण्याला अंधांच्या शाळेत घालण्याच प्रयत्न केला; पण आजपर्यंत सर्वसाधारण शाळेत शिकत असताना अचानक एका वेगळ्या विश्वात जायचं कसं, या प्रश्नानं आईचं व्याकुळ व्हायची. झगडे सांगत होते... आई म्हणायची माझं पोरगं शिकलं नाय तरी चालंल. उंबऱ्यात बसून घराची राखण करंल. हळूहळू गावातील रस्त्यावर फिरू लागलो. लोकांमध्ये मिसळू लागलो. आत्मविश्वास वाढला. पोहायला शिकलो. १९८७ मध्ये सत्यशोधक अंध कल्याण केंद्राच्या माध्यमातून गावातील शाळेत एकात्म शिक्षण योजना सुरू झाली. सर्वसाधारण मुलांमध्ये बसून अंध मुलांना शिकता यावं, यासाठी केंद्र शासनाची ही योजना होती. त्याचा पहिला विद्यार्थी मी होतो. रायटरची मदत घेऊन शिकत राहिलो. बारावीत नापास झालो. १९९२ मध्ये पुण्यात नॅब संस्थेच्या माध्यमातून अंधांसाठी काम सुरू केले; पण स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. नॅबचे काम करत असतानाच टेलिफोन आॅपरेटरचा कोर्स केला. पुण्यात अंधांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. अंधांना चाळीस वर्षांपर्यंत सांभाळण्याची त्यांची तयारी असते; पण कुणावर ओझं होऊन जगणं मनाला पटत नव्हतं. अखेर पुणे सोडले आणि गाव जवळ केलं.त्यावेळी ४० ते ४५ टक्के अंधत्व असणाऱ्यांना शासकीय नोकरी मिळत होती. शासनाच्या या निर्णयाबद्दल पूर्ण माहिती काढली. अंधांच्या १५० जागा रिक्त होत्या. त्याबद्दल न्यायालयात दाद मागितली. २००७ मध्ये उच्च न्यायालयाने अंधांच्या संपूर्ण जागा भरण्याचा निकाल दिला. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी संस्थेचे चेअरमन एन. डी. पाटील, सचिव अशोकराव भोईटे यांनी मोलाचे सहकार्य केले. अशा संघर्षमय प्रवासातून सध्या साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात टेलिफोन आॅपरेटर या पदावर नोकरी करत आहे. या प्रवासात पत्नी अर्चना, मुलगा आदित्य अन् मुलगी गायत्री यांची खंबीर साथ मिळाली आणि आजही मिळत आहे, असं कृतज्ञतापूर्वक झगडे सांगतात.एसटी बसमध्ये अंधांना बसण्यासाठी राखीव सीट आहेत. मात्र, अनेकदा अंध व्यक्तीला उभे राहून प्रवास करावा लागतो. याबाबत कंडक्टरला विचारले तर ‘ज्या ठिकाणाहून गाडी सुटते, तेथूनच बसावे लागते,’ असे उत्तर मिळते. मधल्या थांब्यावर एखादी अंध व्यक्ती बसमध्ये चढली तरी त्या राखीव जागेवर त्याला बसण्यासाठी जागा दिली जात नाही.’ शासनाचा हा नियम चुकीचा आहे. महामंडळाने यावर विचार करून अंधांना त्यांच्या हक्काची सीट मिळण्याबाबत प्रयत्न करावेत.- दिनकर झगडे, नांदवळआज बहुविकलांग दिन...थोर समाजसेविका हेलन केलर यांच्या जन्मदिनी म्हणजे २७ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय बहुविकलांग दिन’ पाळला जातो. त्यानिमित्त जिल्ह्यातील कर्तृत्त्ववान अंध व्यक्तिमत्त्वांचा शोध घेण्याचा छोटासा प्रयत्न आजच्या अंकात...अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्नअंधश्रद्धेमुळे मला माझी दृष्टी गमवावी लागली. इतरांच्या आयुष्यात असे घडू नये, यासाठी दिनकर झगडे यांनी आपल्या गावात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम घेऊन जनजागृती केली. ते गावात आरोग्य शिबिरांचे आयोजनही करत असतात. अंधांना स्वावलंबी बनविण्यासाठी नॅबच्या माध्यमातून ते जिल्ह्यात काम करत आहेत.