उंडाळे : कऱ्हाड दक्षिणमधील उंडाळे परिसरातील तब्बल २६ गावे तंटामुक्त झाली. प्रत्येक तंटामुक्त गावाला शासनाकडून गौरविण्यात देखील आले. त्यामुळे या गावातील कौटुंबिक वाद हे नाहीशे झाले होते. गेल्या काही दिवसांपासून या तंटामुक्त गावातील तंटामुक्त अभियानाचा बोजवारा उडाला आहे. अभियानाला खो लागला असून, तंटामुक्त अभियानाचे फलकच गायब झाले आहेत. त्यामुळे ‘आमचे गाव हे तंटामुक्त अभियानाचे गाव आहे’ अशी म्हणण्याची वेळ गावातील ग्रामस्थांनावर आली आहे. कऱ्हाड तालुक्यातील गावांमध्ये तंटामुक्त अभियानाची सुरुवात झाली तेव्हापासून तालुक्यातील बहुतांशी गावे तंटामुक्तीमध्ये आघाडीवर होती. यामध्ये उंडाळे परिसरातील तब्बल २६ गावे तंटामुक्त झाली. ही गावे तंटामुक्त करण्यासाठी गावागावात या अभियानाची प्रबोधनाद्वारे मोहीम राबविण्यात आली. तंटामुक्त गाव करण्यासाठी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बरकत मुजावर यांनी ही मोहीम राबवत असताना तंटामुक्तीचे अध्यक्ष, सदस्य यांच्या कार्यशाळा घेतल्या. त्याचबरोबर पोलीसमित्र, कऱ्हाड तालुका गुन्हे नियंत्रण समिती यासारख्या समित्या स्थापन करून त्यांच्यामार्फत अभियान राबविले. तंटामुक्त अभियानाचा नारा देऊन बरीच गावे तंटामुक्तीमध्ये सामिल करून घेतली. तंटामुक्त झालेल्या गावांत अवैद्य धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच लोकांचा तंटामुक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या अभियानाचा बोजवारा उडाला आहे. (वार्ताहर)
२६ गावांतील तंटामुक्त अभियानाला खो!
By admin | Updated: November 20, 2015 00:09 IST