सातारा : वाळलेलं गवत... काही दिवसांनंतर विघ्नसंतोषी मंडळींनी लावलेले वणवे. यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वच डोंगर ओसाड झाले होते. जनावरांना चारा मिळत नव्हता. सातारा परिसरात गेल्या काही दिवसांत पावसाच्या सरी कोसळल्या अन् डोंगरांनी हिरवा शालू पांघरली. हिरवं गवत पाहून मेंढ्यांची पावलंही डोंगराच्या दिशेने धावू लागली आहेत.सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे. परंतु या तालुक्यांमध्येच वरुणराजाही नेहमी पाठ फिरवतो. यंदाही या चार तालुक्यांमध्येही चांगलाच दुष्काळ अनुभवास मिळाला. जनावरांना चारा मिळेना. पिण्यासाठी पाणी मिळेना म्हणून मोठी जनावरं घेऊन शेतकरी चारा छावणीत गेले; पण शेळ्या, मेंढ्यांच्या पोटाची सोय झालीच नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुतांश मेंढपाळांनी स्थलांतर केले होते. काहीजण मराठवाड्यात तर काही मेंढपाळांनी कोकणाचा रस्ता धरला होता.सातारा जिल्ह्यात आता पावसाला सुरुवात झाली आहे. ही वार्ता समजल्यानंतर मेंढपाळ कोकणातून गावाकडे परतायला लागले आहेत. त्यामुळे ते सध्या सातारा शहर परिसरातून मार्गक्रमण करत आहेत. याच रस्त्यात यवतेश्वर, सज्जनगड, अजिंक्यतारा डोंगरावर पावसामुळे हिरवे गवत उगवायला सुरुवात झाली आहे. गवत अद्याप मोठे झालेले नसले तरी डोंगररांगा हिरव्या दिसत आहेत. त्यामुळे शेळ्या, मेंढ्यांना गवत आकर्षित करत आहे.कित्येक महिन्यांपासून ते वाळलेले गवत, शेंगा, गवताच्या काड्या खाऊन भूक भागविली आहे. या जनावरांना सातारा परिसरातील डोंगर पाहिल्यानंतर मेजवाणी मिंळत असल्याचा आनंद होत आहे. त्यामुळेच साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावरील डोंगरात गवत खाण्यासाठी मेंढ्या पळत आहेत. हिरव्या डोंगरावर चरणाºया मेंढ्या पाहिल्यानंतर माणसांचे मनही भरून येते.
हिरवा डोंगर पाहून मेंढ्याही खूश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:53 PM