लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या मंजुरीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून मार्गी लागलेला नव्हता. श्रेयवादाच्या वादात अडकलेली ही फाईल ‘भाजप’च्या प्रयत्नामुळे पुन्हा उघडली असून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रस्तावावर नुकत्याच सह्या केल्या आहेत. त्यामुळे लोणंद नगरपंचायतीचा मार्ग खुला झाला आहे. लोणंद ग्रामपंचायतीची सत्ता जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. बाळासाहेब बागवान यांच्याकडे असताना लोणंदच्या विकासातील निधीचे अडथळे दूर व्हावेत, लोणंद नगरपंचायत व्हावी म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद नगरपंचायत होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यावेळी पंचायत समिती, जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे असतानाही लोणंद नगरपंचायत होण्यासाठी त्यांनी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले होते. त्यावेळी लोणंद नगरपंचायत कसल्याही परिस्थितीत व्हावी म्हणून सर्वांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले असताना केवळ श्रेयवादापायी लोणंद नगरपंचायतीच्या फाईलची अडवाअडवी तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केली होती. त्यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण या प्रस्तावासाठी अनुकूल असतानाही नगरपंचायतीचा निर्णय झाला नव्हता. त्यानंतर लोणंद नगरपंचायतीबाबत आजपर्यंत उलटसुलट चर्चा सुरू होती. राज्यामध्ये भाजप-सेनेचे सरकार आल्यापासून लोणंद पंचायत समितीचे माजी सभापती विनोद क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शेळके, नारायण साळुंखे, सुभाष क्षीरसागर, तुकाराम क्षीरसागर, शिरीष मेहता यांनी लोणंद नगरपंचायत व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत असून, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावावर सही केली आहे. यामुळे नगरपंचायतीचा मार्ग खुला झाल्याचे लोणंद भाजपच्या वतीने सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)
लोणंद नगरपंचायतीचा मार्ग मोकळा!
By admin | Updated: August 22, 2015 00:56 IST