सातारा : लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने स्वातंत्र्यदिनी पाचवड येथील गोपाळ समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पाचवड, ता. वाई येथे ६० वर्षांपासून गोपाळ समाज राहात आहे. गट क्रमांक ६६८ मध्ये असणाऱ्या ओढ्यालगत त्यांचे वास्तव्य आहे. राहण्यासाठी पक्के घर नाही. पावसाळ्यात झोपड्यांत पावसाचे पाणी शिरते. पाण्यासोबत साप, विंचू यांचा त्रास होतो. तसेच त्यांना पिण्यासाठीही चांगले पाणी नाही. अशा स्थितीमध्ये पाचवड ग्रामपंचायतीतील काहींनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून वीजजोडणी तोडण्याचे षड्यंत्र केले. सध्या वीज नसल्याने लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विजेसाठी कागदपत्रांची आवश्यकता असताना ग्रामपंचायतीकडून अडवणूक केली जाते. तसेच काहींनी मुंबईच्या महावितरण कार्यालयातून संबंधित जागेत वीज मिळू नये असे मत मिळविले आहे. मात्र, या समाजाच्या व्यतिरिक्त त्याच गटात व शेजारील गटामध्ये इतर अनधिकृत राहात असणााऱ्या कुटुंबांना सर्व सुविधा मिळतात. मग, गोपाळ समाजावरच का अन्याय होत आहे?
गोपाळ समाजाने मतदानाचा हक्क अनेकवेळा बजावला आहे. या लोकांकडे आधार आणि रेशन कार्डही आहे. शासन घर नसणाऱ्यांना ते शासकीय जागेत देते, तर दुसरीकडे पाचवडमधील काहीजण या समाजाला शासकीय जागेतून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत चौकशी करून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आहे.
या आंदोलनात लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपाळ समाजातील बांधव सहभागी झाले होते.
फोटो दि. १६ सातारा लोकजनशक्ती पार्टी फोटो...
फोटो ओळ : सातारा येथे लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. (छाया : जावेद खान)
.................................................